पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंच्याच हाती!

By Admin | Updated: August 7, 2015 22:14 IST2015-08-07T22:14:37+5:302015-08-07T22:14:37+5:30

आधे इथर, आधे उधर : सातारा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील लढायांनंतरचे चित्र संमिश्र--ग्रामपंचायत विश्लेषण

Changed the cards, but the hand of kings is in hand! | पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंच्याच हाती!

पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंच्याच हाती!

सागर गुजर- सातारा -पत्त्यांच्या खेळात हुकमाची पाने ज्याच्याकडे जास्त तो विजयी होतो. हुकमाची पाने असणारा सवंगडी समोर असला म्हणजे जीत आपलीच, हे जो जाणतो, तो खरा माहीर खेळाडू ठरतो. सातारा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही असे खेळाडू लढले. पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंनीच जिंकला.
जिल्ह्यात कुठेही कुणाची सत्ता असेना; पण सातारा शहरासह तालुक्यात दोन राजेंशिवाय पर्याय नाही, हे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर पुन्हा सिद्ध झाले. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याने त्या-त्या ठिकाणचे पत्ते बदलले गेले. जिंकून आलेले नवे भिडू काहीजण ‘जलमंदिर पॅलेस’वर तर काही ‘सुरुची पॅलेस’वर जाऊन भेटून आले. त्यामुळे कुणाचेही पॅनेल निवडून आले तरी सातारा तालुक्यात राजेंचा प्रभाव मात्र कायम आहे.
तालुक्यातील ४१ पैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले. २८ गावांत सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. शेंद्रे, परळी, डोळेगाव, संभाजीनगर, बोरगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह इतर काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाले. सत्ता बदल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्येच लढाया झाल्या.
डोळेगावात खासदार समर्थकांची २५ वर्षे सत्ता होती. मात्र, ती उलथवून टाकत आमदार गटाने परिवर्तन घडविले. परळीतही आमदार गटाने मुसंडी मारली. शेंद्रेमध्ये आमदार गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड व सहकाऱ्यांंच्या अजिंक्य पॅनेलने परिवर्तन घडविले. सासपडेत आमदार गटाचे मधुकर यादव यांनी ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम राखली. बोरगावातही आमदार गटाने सत्ता काबीज केली आहे. नागेवाडी, गजवडी, गवडीतही आमदार गटाचेच वर्चस्व आहे.
महादरेची सत्ता कायम राखण्यात खासदार उदयनराजे गटाला यश आले. कारंडवाडीत खासदार गटाने आमदार गटाचा ६-५ असा पराभव केला. या परिस्थितीत कुठल्या राजेंकडे किती ग्रामपंचायती, याची चर्चा सुरू आहे.

कारभाऱ्यांचा प्रभाव ओसरला!
संभाजीनगर ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे व आनंदराव कणसे यांनी सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी धडपड केली; पण संभाजीनगरातील जनतेने त्यांची सत्ता उलथून टाकली. १७ जागांपैकी त्यांना अवघ्या सहा जागा मिळविता आल्या. या ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाची सत्ता आली आहे.

मनोज घोरपडेंचा फत्त्यापुरात करिष्मा
कऱ्हाड उत्तर विधानसभा लढलेले स्वाभिमानी पक्षाचे मनोज घोरपडे यांचा फत्त्यापूरमध्ये करिष्मा कायम आहे. घोरपडे यांच्या गटाने ५ विरुद्ध ४ अशा फरकाने फत्त्यापूर ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याने हा करिष्मा सिद्ध झाला.


विलासपुरात मनोमिलनाला तीन अपक्षांचा चेक
विलासपूर ग्रामपंचायत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन गटांनी मनोमिलनाच्या माध्यमातून लढविली. शिवेंद्रसिंहराजे समर्थक फिरोज पठाण यांनी जोरदार प्रयत्न करून १३ पैकी ९ जागा मिळविल्या; पण तीन अपक्षांनी ग्रामपंचायतीत शिरकाव करून मनोमिलनाच्या सत्तेला ‘चेक’ दिला आहे.

खेडमध्ये सत्ता उलथण्याचे
मनसुबे धुळीला
खेड ग्रामपंचायती आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली होती; पण विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले. अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ग्रामविकास आघाडीने १७ पैकी १३ जागा पटकावल्या. हरिभाऊ लोखंडे, मिलिंद पाटील यांच्या गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. तर संदीप मोझर यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.

Web Title: Changed the cards, but the hand of kings is in hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.