पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्यासाठी ३७१ कलमात बदल करा
By Admin | Updated: August 7, 2014 00:15 IST2014-08-06T22:35:31+5:302014-08-07T00:15:27+5:30
वाठार स्टेशन : रामराजे यांचा मोदी यांना उपरोधिक सल्ला

पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्यासाठी ३७१ कलमात बदल करा
वाठार स्टेशन : ‘देशात ३७० घटनेनुसार समान नागरी कायदा राबवण्यापूर्वी ३७१ मध्ये बदल करण्यासाठी पुढाकार घ्या. त्याबाबतचे अधिकार गव्हर्नरना द्या, तरच पश्चिम महाराष्ट्रातील वंचित पाणी योजना पूर्ण होतील, याची माहिती नसेल तर मी देतो,’ असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात दिला.
वाठार स्टेशन विकास सेवा सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. यावेळी फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, सतीश धुमाळ, पंचायत समिती सदस्या रूपाली जाधव, नागेश जाधव, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे रामभाऊ लेंभे, वीरसेन पवार, अजय कदम, लालासाहेब शिंदे, बबनराव भोसले उपस्थित होते.
रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘वसना-वांगनाची लढाई ही आता तालुक्याची राहिली नाही. त्यासाठी एक राजकीय शक्ती उभारावी लागणार आहे. या योजनांबाबत ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांच्यात या योजना पूर्ण करण्याची धमक आहे, अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचे सामर्थ्य ठेवा. उगाच ज्या पक्षांनी सर्वसामान्यांना फाशी घ्यायची वेळ आणली, अशा प्रवृत्तीमागे जाऊ नका. वसनेतून जी गावे वंचित राहिली, त्यासाठी पाण्याची तरतूद करावी लागेल, यासाठी सोळशी धरणाबाबत आग्रही राहा.’
जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले, ‘सहकारी संस्थेत सचिव हाच त्या संस्थेचा मुख्य गाभा असतो. ज्या संस्था मोठ्या होतात त्यांचा पाया मजबूत असतो, त्यामुळेच जिल्ह्यातील सहकारात नेत्रदीपक काम जिल्हा बँक करू शकली.’
नागेश जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उत्कृष्ठ काम करणारे सचिव बबन भोसले यांचा रामराजेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)