बंगालमधून कोकणात आली ‘चंद्रगुप्ताची सेना’
By Admin | Updated: March 2, 2016 00:54 IST2016-03-01T23:15:42+5:302016-03-02T00:54:23+5:30
शौर्य-चातुर्याचा मिलाफ : मेंदू अन् मनगटाच्या ताकदीवर दृढविश्वास असलेली स्वामिनिष्ठ माणसं अर्थात ‘सीकेपी’

बंगालमधून कोकणात आली ‘चंद्रगुप्ताची सेना’
राजीव मुळ्-- सातारा -‘मेंदू आणि मनगट येता एका ठायी, तेव्हाच जिंकली जाते खरी लढाई,’ असे ब्रिद बाळगणारा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी समाज संख्येने अत्यल्प; परंतु स्वामिनिष्ठ म्हणून ओळखला गेलेला. तलवार आणि कलम ही दोन शस्त्रे पूर्वापार परजत आलेला. शौर्याबरोबरच बुद्धिचातुर्याने आपले स्थान भक्कम करणारा. शहर आणि जिल्ह्यात मिळून अवघी शे-सव्वाशे कुटुंबे असली, तरी याच गुणांमुळे या समाजातील व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख बनविली आहे.
सीकेपी समाज बंगालमधून येऊन कोकणात स्थिरावला, चंद्रगुप्त मौऱ्याच्या सेनेत आघाडीवर राहिलेले सैनिक म्हणून ‘चांद्रसेनीय’ हा शब्द आला तर राजदरबारी लेखनिकाचे, चिटणिसीचे काम मिळाल्यावर ‘कायस्थ’ शब्द जोडला गेला. अलिबाग, रोहा, महाड भागात हा समाज मोठा आहे. हिशेब ठेवण्यासाठी मुख्यत्वे नेमणूक असली, तरी निर्णय घेताना त्यांचा सल्ला राजांनी वेळोवेळी घेतला. पहिला पेशवा नेमताना सातारच्या शाहू महाराजांनी खंडो बल्लाळ चिटणीस यांचा सल्ला घेतला तर रंगो बापूजी गुप्ते यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचा खटला लंडनमध्ये लढविला. ‘तुम मुझे खून दो..’ म्हणणारे सुभाषबाबू आणि ‘जय जवान-जय किसान’चा नारा देणारे लालबहादूर शास्त्रीही सीकेपीच.
निर्णयाच्या घडीला सीकेपी व्यक्तींनी अचूक मार्ग शोधल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पाठलाग करणाऱ्या शत्रूला घोडखिंडीत रोखायचे आणि शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांसह विशाळगडला जायचे, हा निर्णय घेऊन घोडखिंड आपल्या रक्ताने पावन करणारे बाजी प्रभू देशपांडे सीकेपी समाजातलेच. देशउभारणीसाठी मोठा निधी उपलब्ध करण्याच्या हेतूने खासगी विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे सी. डी. देशमुखही सीकेपी. संकटांना धीरोदात्तपणे परतवून हरघडी अविचल, खंबीर राहिलेले बाळासाहेब ठाकरे तर लाखोंच्या गळ्यातले ताईत. शेतकऱ्यांना सर्वप्रथम संघटित करणारे र. बा. दिघे यांचे कार्य चळवळींच्या क्षेत्रात मोलाचे. अभिनेते राजशेखर, अभिनेत्री वंदना गुप्ते, गायक-संगीतकार-दिग्दर्शक अवधूत गुप्ते याच समाजातले.
एकविरा देवी आणि जेजुरीचा खंडोबा ही सीकेपी समाजाची प्रमुख श्रद्धास्थाने. याखेरीज प्रत्येक कुळाचे वेगवेगळे कुलदैवत आहे. तुळजाभवानी, जन्नीमाता, पद्माावती देवी या सीकेपी समाजाच्या आराध्य देवता. कोकणाबरोबरच बडोद्याला सीकेपी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. इतरत्र फारच कमी संख्येने असणारा हा समाज एकसंधता टिकवून आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात अवघी सव्वाशेच्या आसपास सीकेपी कुटुंबे असून, शहरात तर केवळ पन्नास-साठ घरेच आहेत. मुंबईत दादरमध्ये आणि ठाण्याला समाज मोठा आहे. ठाण्यात तर या समाजाची तीन वातानुकूलित कार्यालये आहेत.
मोठी उलाढाल असलेली सहकारी बँकही आहे.
सौंदर्यवती अन् सुगरणी
‘सीकेपी समाजातील महिला रूपवान असतात,’ असे या समाजातील पुरुष अभिमानाने सांगतात. परंतु याहून अधिक ओळख महिलांनी कमावली आहे ती ‘सुगरण’ म्हणून. मांसाहारी पदार्थ, विशेषत: मासे खावेत तर सीकेपींच्या घरी, असं अनेकजण सांगतात. कोकणात तर फलकावरील अडनाव पाहून लोक खानावळ निवडतात. सीकेपी महिलांच्या पूजा-अर्चांमध्येही अन्नपूर्णेला महत्त्व. महिला एकत्र जमून ‘कुंकुमार्चन’ कार्यक्रम करतात. यात अन्नपूर्णेला कुंकवाचा अभिषेक आणि श्रीसूक्ताचा ११०० जप केला जातो.
‘रंगो बापूजी गुप्ते
हॉल’चे स्वप्न
जिल्ह्यातील सीकेपी समाज स्रेहसंमेलन, सहली अशा माध्यमातून एकत्र येतो. एकत्र येण्याचे प्रमाण २००९ पर्यंत कमी होते. परंतु नंतर दरवर्षी सर्वजण एकत्र येतातच. अखिल भारतीय चां. का. प्रभू मध्यवर्ती संस्थेच्या राज्य आणि जिल्हास्तरावर शाखा आहेत. साताऱ्यातील शाखा शिरीष चिटणीस, सुरेश शिकारखाने आदींच्या प्रयत्नांतून वाटचाल करीत आहे. रंगो बापूजी गुप्ते यांच्या नावाने साताऱ्यात एक हॉल बांधायचा, असे संघटनेचे स्वप्न असून, त्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू आहे.