बंडखोरी अन् उमेदवार मिळविण्याचे आव्हान
By Admin | Updated: July 17, 2016 01:04 IST2016-07-16T22:19:33+5:302016-07-17T01:04:56+5:30
- पाटण नगरपंचायत - शह काटशह

बंडखोरी अन् उमेदवार मिळविण्याचे आव्हान
अरुण पवार ---पाटण -पाटण शहरावर पकड असलेल्या पाटणकर गटात आता यापुढे डोकेदुखी वाढणार आहे. १७ प्रभागांमध्ये उमेदवारी देताना आणि नाराजांना खाली बसवताना नाकीनऊ येणार आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधक आमदार देसार्इंचे पॅनेल निवडणुकीत उतरणार असेल तर त्यांना प्रथमत: १७ प्रभागांत उमेदवार मिळविण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.
नगरपंचायत दर्जामुळे मान प्रतिष्ठा आहे. त्यामळे या निवडणुकीत लक्ष घालून किमान काही नगरसेवक हाताला लागले तरी बरेच काही मिळविले अशा मानसिकतेत देसाई गट, भाजपा, मनसे व इतर स्वतंत्र गट आहे. दुसरीकडे आतापर्यंत तरी पाटण शहरावर एक हाती सत्ता असलेले माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर गटाला पूर्वीच्या ग्रामपंचायतीसारखे वर्चस्व कसे राखता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रभाग कसे बिनविरोध होतील, याचेही प्रयत्न करावे लागतील. मात्र, पाटण शहरात अलीकडेच सक्रिय झालेला वेगळा गट मोठा अडथळा ठरणार आहे. पाटण नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्यजित पाटणकर यांचे कौशल्य कामी येणार आहे. कारण मागील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांची मोठी महत्त्वाची भूमिका होती. पिण्याचे पाणी, कचरा, आदी विकासकामे झाली नसल्यामुळे पाटणमध्ये राहणाऱ्या नागरिकांची मोठी नाराजी आहे.
दुसरीकडे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांना स्वत:चे पाठबळ पाटण शहरात वाढवायचे आहे. त्यासाठी शहरातून देसार्इंच्या मागे उघडपणे सक्रिय राहणारा गट त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे आलेली नगरपंचायत आमदार देसार्इंना पूर्ण शक्तीनिशी लढवली तर ते त्यांना भविष्यात फायद्याचे ठरणार आहे. शेवटी निवडणुकीत पाटणकरांचे पारडे जड राहणार हे निश्चित आहे.
प्रभागातील उमेदवारांना मतदान..
पूर्वी वॉर्डात निवडणूक लढविणाऱ्या तिघांना अथवा दोघांना मतदान करावे लागत होते. आता मात्र, नगरपंचायत निवडणुकीत प्रभागातील एका उमेदवारासच मतदान करावे लागणार आहे. ज्या प्रभागावार ज्या समाजाची, व्यक्तीची किंवा मंडळे, संस्था यापैकी कोणाचीही पकड असेल त्यांचाच विजय होणार आहे. तिथे नेते, पक्ष या बाबी दुय्यम ठरणार असल्याचा कयास विश्लेषकांचा आहे.