बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:39+5:302021-02-05T09:12:39+5:30
मल्हारपेठ : येथील बाजारपेठेत बनावट नोटा खपविणाऱ्यास पोलिसांनी अटक केल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या बनावट नोटा ...

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान
मल्हारपेठ : येथील बाजारपेठेत बनावट नोटा खपविणाऱ्यास पोलिसांनी अटक केल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या बनावट नोटा आणल्या कोठून, याबाबत आरोपी पोलिसांना माहिती देत नसल्याने त्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा म्होरक्या कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकुमार गणपत शिंदे (वय ४१, रा. माळीनगर-उंब्रज) असे बनावट नोटाप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजकुमार शिंदे हा शनिवारी दुपारी मल्हारपेठ येथे आला. त्याने बसथांबा परिसरातील काही दुकाने व पान टपरीमध्ये साहित्य खरेदी करताना त्याच्याकडील नव्या शंभर रुपयांच्या बंडलमधील नोटा दिल्या. संशयित हा पुन्हा दुसऱ्या दुकानात जाऊन तशाच पद्धतीने खरेदी करत असल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नोटांची खातरजमा केली असता त्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर संशयितास पकडून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दुकानदारांनी तत्काळ ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देत त्याला त्यांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडे आणखी काही शंभर रुपयांच्या नोटा मिळून आल्या आहेत.
पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता तो माळीनगर-उंब्रज येथील राहणारा असून तेथे त्याचे फूटवेअरचे दुकान असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या उंब्रज येथील घरी व दुकानात झाडाझडती घेतली. त्याठिकाणी काहीही मिळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. राजकुमार शिंदे हा उंब्रज येथील असल्याने त्याठिकाणी बनावट नोटांचे वितरण झाले आहे का? तसेच त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे का? या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे? याचा सखोल तपास करतानाच बनावट नोटांच्या रॅकेटचा पोलिसांना पर्दाफाश करावा लागणार आहे.
- चौकट
कऱ्हाडातही रॅकेट उघडकीस
दोन महिन्यापूर्वी कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी येथे बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याप्रकरणी सांगली येथील एका मुख्य सूत्रधारास कऱ्हाड पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच मल्हारपेठ येथे नवीन प्रकरण उघडकीस आले असल्याने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पाटण पोलिसांसमोर असून ग्रामीण भागात पसरत असलेले बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करावे, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांमधून होत आहे.