चाफळची पशुवैद्यकीय इमारत कोसळण्याच्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:12+5:302021-02-07T04:36:12+5:30
दरम्यान, या इमारतीजवळ एका खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे. या शाळेत जाताना बालचमूंना या इमारतीला वळसा घालून जीव मुठीत ...

चाफळची पशुवैद्यकीय इमारत कोसळण्याच्या स्थितीत
दरम्यान, या इमारतीजवळ एका खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे. या शाळेत जाताना बालचमूंना या इमारतीला वळसा घालून जीव मुठीत घेऊन जावे लागते. प्रशासनाने ही धोकादायक इमारत पाडून ती जागा श्रीराम देवस्थान ट्रस्टला वर्ग करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
संपूर्ण विभागाचे मुख्य ठिकाण व बाजारपेठेचे ठिकाण ठरलेल्या चाफळ गावामध्ये सुमारे वीस वर्षांपूर्वी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी येथील श्रीराम देवस्थान ट्रस्टने दवाखान्यासाठी जागा देऊ केली होती. कालांतराने दवाखान्याचे बांधकाम पूर्ण होऊन दवाखाना सुरू झाला. त्यानंतर परत देवस्थानच्याच दुसऱ्या जागेत हा दवाखाना स्थलांतरीत करण्यात आला. सध्या याही दवाखान्यात अपुऱ्या सोईसुविधा आहेत. दवाखाना स्थलांतरीत झाल्यानंतर मूळच्या दवाखान्याची इमारत धूळखात पडून आहे. सध्या ही इमारत मोडकळीस येऊन भिंती पडल्याने इमारतीत ठेवण्यात आलेले साहित्य कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा नाहक त्रास परिसरातील ग्रामस्थांसह इमारतीनजीक असणाऱ्या इंग्लिश मीडिअम स्कूलच्या बालचमूंना सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्कूल बंद असले तर येथे काही लहान मुले दररोज खेळत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- चौकट
ट्रस्टच्या व्यवस्थापनाने लक्ष घालावे!
बंद असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत व आजूबाजूची जागा श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या नावे असल्याने व्यवस्थापक बा. मा. सुतार, विश्वस्त अनिल साळुंखे, लक्ष्मण बाबर यांनी याकामी लक्ष घालून पशुवैद्यकीय दवाखान्याची मोडकळीस आलेली व धोकादायक झालेली इमारत पाडून संपूर्ण जागेत कंपाऊंड घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- चौकट.
मूळच्या दवाखान्याची इमारत धूळखात पडून आहे. सध्या ही इमारत मोडकळीस येऊन भिंती पडल्याने इमारतीत ठेवण्यात आलेले साहित्य कुजले आहे. याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुनी इमारत पाडून देवस्थानने जागा परत ताब्यात घ्यावी.
- निलेश पवार, ग्रामस्थ
फोटो : ०६केआरडी०४
कॅप्शन : चाफळ, ता. पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत कोसळण्याच्या स्थितीत असून ती पाडण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.