चाफळ विभागाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:46+5:302021-06-05T04:27:46+5:30
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडित केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

चाफळ विभागाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडित केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. विशेष म्हणजे या चाफळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका भारती हांडे या काळात कोरोना बाधित निघाल्या. कोरोनावर मात केल्यानंतर लगेचच रूजू होत गावोगावचे लसीकरण पूर्ण केले.
कोरोनाने दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लाॅकडाऊन सुरू केले आहे. चाफळ विभागातही याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत येथील आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे. संपूर्ण डोंगर दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. विभागातील बहुतांश गावे ही डोंगर कपारीत वसलेली आहेत. यातील १९ गावांत दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव करत १४० जण बाधित आढळले होते.
या कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. वाडीवस्तीवरील घरोघरी जाऊन विविध उपाययोजना राबवत जनसामान्यांत जनजागृती केली आहे. गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल, याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.
सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विलगीकरण कक्षातील कोरोना बाधितांवर वेळोवेळी औषधोपचार करत गावोगावी राबवलेल्या इतर उपाययोजनांमुळे चाफळ विभागात कोरोनाची संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण चाफळ विभाग कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्याची मागणी चाफळ विभागातील ग्रामस्थांनी केली आहे.