दाखल्यांचा सेतू फुल्ल!

By Admin | Updated: July 31, 2014 23:27 IST2014-07-31T21:05:25+5:302014-07-31T23:27:21+5:30

मराठा समाजाची दमछाक

The certificate is full! | दाखल्यांचा सेतू फुल्ल!

दाखल्यांचा सेतू फुल्ल!

सातारा : मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर दाखले काढण्यासाठी विविध प्रांत कार्यालय आणि सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यातील मराठा समाजातील तीन हजारांहून अधिक जणांनी ‘आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागसलेला प्रवर्ग’ दाखले मिळविले आहेत. दरम्यान, काही सेतू केंद्रात दाखले काढण्यास विलंब होत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करतानाही मराठा समाजाची दमछाक होऊ लागली आहे.
राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, हे आरक्षण फक्त नोकरी आणि शिक्षणात देण्यात आलेले आहे. मराठा समाजाला ‘आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागसलेला प्रवर्ग’ (इॅकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लास -ईएसबीसी) असे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील दाखले मिळावेत म्हणून अनेकांनी आपली माहिती गोळा करून त्याची पूर्तता संबंधित कार्यालयाकडे करण्यास सुरुवात केली आहे. १९६७ पूर्वीचा पुरावा यासाठी बंधनकारक केल्यामुळे ते दाखलेही जमा करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण आणि माण असे सात उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागात ‘ईएसबीसी’चे दाखले मिळावेत म्हणून हजारो अर्ज आले आहेत. प्रत्येक विभागातून जवळपास सरासरी चारशे ते पाचशे ‘ईएसबीसी’ दाखले मराठा समाजाला देण्यात आले आहेत. याची एकूण आकडेवारी तीन हजारांच्या पुढे जात आहे. शिक्षणात आरक्षण मिळाल्यामुळे आता दाखले मिळविण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रातून याची माहिती संकलित केली जात आहे. त्यानंतर अंतिम प्रक्रिया ही प्रांताधिकारी कार्यालयातून होत आहे. मात्र, नॉन क्रिमिलरचा दाखला मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होत असल्याची माहितीही विविध प्रांताधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

सातारा उपविभागात सातारा आणि जावळी तालुक्यांचा समावेश आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत महा ई-सेवा केंद्र आहेत. तेथेही काही कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर आणि त्याबाबतचा अध्यादेश निघाल्यानंतर सातारा प्रांत कार्यालयातून आत्तापर्यंत चारशेहून अधिक ‘ईएसबीसी’चे दाखले देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

Web Title: The certificate is full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.