केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत : सुरेश माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:57+5:302021-02-09T04:41:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील ...

केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत : सुरेश माने
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असून, ते केंद्र व राज्य सरकारने तातडीने घ्यावेत,’ अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने ५० दिवसीय राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेचे आगमन रविवारी (दि. ७) फलटण शहरात झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात समतोल विकासासाठी विशेष मागास जिल्हे, तालुक्यातील विकासाकरिता पुरेसा निधी व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करावी, सरकारी नोकर भरतीतील कंत्राटी पद्धत बंद करून तातडीने नोकर भरती करावी, राज्यातील सर्व विद्यार्थी वसतिगृहांचे आधुनिकीकरण करावे, खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये आरक्षण लागू करावे, राज्यातील मुस्लिमांना मागासलेपणाच्या आधारावर शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे सांगून आगामी काळात केंद्र सरकारच्या नागरिकत्व धोरण व एन. आर. सी.विरोधात पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी अॅड. डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.