लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तालुक्यातील बेबलेवाडी येथे एका सेंट्रिंग व्यावसायिकाला पाईप तसेच दगडाने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वेदांत चव्हाण, मदन चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, बेबलेवाडी येथील अरुण कोटेश्वर चव्हाण यांच्या घराचे बांधकाम सुरु असून, ते काम सुशील मोहन चव्हाण (वय २७, रा. बेबलेवाडी, पो. नुने, ता. सातारा) यांच्याकडे आहे. हे काम करत असताना ‘तुम्ही काल सांगितलेल्या मापापेक्षा ही जागा जास्त भरत आहे,’ असे सुशील यांनी अरुण यांना सांगताच रागाच्या भरात अरुण याने सुशील यांना हाताने मारहाण केली. यावेळी पृथ्वीराज सुभाष चव्हाण, वेदांत अरुण चव्हाण आणि मदन कोटेश्वर चव्हाण (सर्व रा. बेबलेवाडी) या तिघांनी सुशील यांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी मदन चव्हाण याने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचा प्लास्टिक पाईप उचलून सुशील यांच्या हात, पायावर मारहाण केली. त्यांचा मोबाईलही फोडून टाकला. वेदांत याने दगडाने मारहाण केली. यात सुशील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि. २४ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दि. २५ जून रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.