ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, शिवमय वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा 

By दीपक शिंदे | Published: December 19, 2023 03:37 PM2023-12-19T15:37:30+5:302023-12-19T15:38:13+5:30

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Celebrating Shiv Pratap Day at Pratapgad in Shivamay atmosphere | ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, शिवमय वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा 

ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, शिवमय वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा 

सातारा : ढोल - ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके अशा अलोट उत्साहात मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात सकाळी आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहन कुंभरोशीचे सरपंच ज्योती जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

आई भवानीच्या आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जावली, दरे, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे लेझीम - तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता.

पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...' या ललकारीने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्यासमोरील चबुतऱ्यावरील भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.

छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान - मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमी कावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Celebrating Shiv Pratap Day at Pratapgad in Shivamay atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.