सातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
By Admin | Updated: July 19, 2015 00:40 IST2015-07-19T00:37:02+5:302015-07-19T00:40:23+5:30
सर्वत्र सामुदायिक नमाजपठण : दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी केली प्रार्थना

सातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद (ईद-उल फितर) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा, कऱ्हाड, फलटण, शिरवळ, खंडाळा, धावडवाडी, कण्हेरी, वाई, महाबळेश्वर, खटाव, माण, म्हसवड, वडूज, कोरेगाव आदी ठिकाणी मुस्लीम बांधवांनी मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर नमाजपठण केले. यानंतर एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या एक आठवड्यापासून बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. ईदच्या पूर्वसंध्येला दूध, सुका मेवा तसेच कपड्यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती.
चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. शनिवारी रमजान ईद असल्यामुळे विविध ठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये व ईदगाह मैदानावर वेळेनुसार नमाजपठण करण्यात आले. यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्या दिल्या. सातारा शहरात शनिवारी दिवसभर सर्वधर्मीय नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्या दिल्या. तसेच मनाचा गोडवा वाढविणाऱ्या शिरखुर्माचा आस्वादही घेतला. काही ठिकाणी पावसामुळे ईदगाह मैदानाऐवजी मशिदींमध्ये नमाजपठण करण्यात आले. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव
रमजान ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारेही देण्यात आल्या. प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्याने अनेक मुस्लीम बांधवांनी एकमेकांना फेसबुक तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पाठवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड देखील लावण्यात आले होते.