गणेशोत्सव करा उत्साहात; पण नियमभंग नको!
By Admin | Updated: August 17, 2016 23:14 IST2016-08-17T22:48:27+5:302016-08-17T23:14:41+5:30
मंडळे सज्ज : पालिका प्रशासनाकडून शहरातील १७६ मंडळांना पत्र, पालिकेकडून विशेष खबरदारी

गणेशोत्सव करा उत्साहात; पण नियमभंग नको!
कऱ्हाड : गणेशोत्सव कालावधीत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. मात्र, मंडळांकडून नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. ती केली जावी व शहरात नियमानुसार गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने यावर्षी मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील १७६ मंडळांना पत्र पाठविले आहे. यामध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने गणेशोत्सवात मंडळांसाठी घालून दिलेल्या नियम व त्याचे अल्लंघन होणारी कारवाई याची माहिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील सार्वजनिक मंडळांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
कऱ्हाड शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी पालिका प्रशासन, पोलिस व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची संयुक्त कमिटी स्थापन केली जाते. तसेच शांतता कमिटीची बैठक घेऊन उपाययोजनाही आखल्या जातात. याकाळात अनेक मंडळांकडून विविध सामाजिक, कौटुंबिक तसेच आरोग्य, राजकीय विषयांबाबत आकर्षक देखावेही सादर केले जातात. तसेच सर्वाधिक शुभेच्छा, स्वागत फलक व कमानी लावल्या जातात. याचबरोबर ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणात केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळांना पालिका प्रशासन व न्यायालयामार्फत नियम घालून दिले आहेत. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याबाबत कऱ्हाड पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शहरातील १७६ सार्वजनिक मंडळांना पत्र पाठविले आहे.
उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकानुसार याचिका क्रमांक १५५$^^-२०११ मध्ये दिले आहे की, नगरपालिका परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचे शुभेच्छा, जाहिरात फलक लावण्यात येऊ नये. त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी. परवानगीशिवाय फलक लावल्यास संबंधितांवर शासकीय मालमत्ता विधिवत कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसेच उच्च न्यायालय जनहित याचिका क्रमांक १७३-२०१० नुसार सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण केल्यास तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर ध्वनी प्रदूषण कायद्यातंर्गत पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक रस्त्यांवरून प्रवास करण्याचा नागरिकांचा प्रथम अधिकार आहे. त्यामुळे याठिकाणी एकूण रस्त्याच्या एकचतुर्थंश जागेतच मंडपाची उभारणी केली जाईल. अशा प्रकारच्या सूचनांचे पत्र शहरातील सार्वजनिक मंडळांना मुख्याधिकारी औंधकर यांच्या वतीने पाठविण्यात आले आहे.
सात प्रभाग असलेल्या कऱ्हाड शहरात १७६ सार्वजनिक मंडळांमध्ये छोट्या-मोठ्या गणेशमूर्ती बसविल्या जातात. अकरा दिवसांच्या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन मंडळांकडून केले जाते. याकाळात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडळांकडूनच फलक लावले जातात. यावर्षी मात्र, पोलिस प्रशासन पालिकेच्या मदतीने मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर सूचना व दिशादर्शक, नो-पार्किंग झोनचे बोर्ड लावणार आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुख्य चौकांसह शहरातील महत्त्वाच्या व अंतर्गत ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत.
यावर्षी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवास शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने सामाजिक विषयांची मांडणी करण्याबाबत तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पालिकेच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांची बैठक शनिवारी सायंकाळी पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
शहरात मोठ्या प्रमाणात असलेली गणेश मंडळांची संख्या लक्षात घेता गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी ही होते. हे लक्षात घेत यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर कारवाई देखील केली जाणार आहे.
- विनायक औंधकर,
मुख्याधिकारी,
कऱ्हाड पालिका
पोलिस प्रशासनाकडून सूचना फलक
तयारीस प्रारंभ
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात शहरात वाहतूक कोंडी होत असते. काही ठिकाणी तर तासन्तास वाहने तशीच उभी राहतात. तर काही ठिकाणी मंडळांकडून मंडप उभारले गेल्याने रस्ता बंद केलेला असतो. अशावेळी वाहनधारकांना दुसऱ्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. याची दक्षता घेत गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी, शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत चौकात दिशादर्शक व सूचना फलक लावण्यासाठी ते तयार करण्याची कार्यवाही सध्या पोलिस प्रशासनाकडून सुरू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना...
पोलिस स्टेशन स्थरावर एक खिडकी योजना अवलंबवावी यामध्ये पोलिस, पालिका, वीजवितरण, धर्मादाय आयुक्त, वाहतूक व्यवस्था व परिवहन कार्यालय यांच्या वतीने एकत्रित परवानगी दिली जाईल.
मंडप उभारणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी.
मिरवणूक मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्डे मुजविणे, सीसीटीव्ही कॅमेरे उभारावे व लाईटची व्यवस्था करावी.
मिरवणुकीतील वाहनांच्या उंचीबाबत परिवहन कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असेल.
घरगुती मूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेने कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था करावी. तसेच ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवावे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फ्लेक्सवर येणारे मजकूर तपासून व पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय जाहिरात फलक लावता येणार नाही.
लोकमान्य टिळक यांच्या गणेशोत्सव स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने विविध सामाजिक विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महावितरण कंपनीकडून संबंधित अधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव व विसर्जन काळात आपत्कालीन यंत्रणेची उभारणी करण्यात यावी.
एक महिना अगोदर मंडळांना पत्र !
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून अनेक नियमांची पायमल्ली केली जाते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस व पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. त्यावेळी मंडळांकडून आम्हाला पालिकेने नियमांबाबत पूर्वसूचना देणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. म्हणून याची दक्षता घेत महिनाभरापूर्वीच शहरातील १७६ मंडळांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांबाबत मुख्याधिकारी औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्र पाठविण्यात आले आहे.