वाईच्या चौकात आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By Admin | Updated: November 6, 2014 00:02 IST2014-11-05T23:49:59+5:302014-11-06T00:02:23+5:30
बारा कॅमरे : गुन्हेगारीला बसणार जरब

वाईच्या चौकात आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’
वाई : वाई शहरामध्ये मुख्य रस्त्यावर सुरक्षिततेच्या कारणासाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस यंत्रणेद्वारे बसविण्यात आल्याने या शहरात ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर राहणार आहे. यामुळे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे आता रहदारीवर नजर राहून गुन्हेगारीला जरब बसून गुन्हेगारीला आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे.
गेल्या दशकात वाई शहराची झपाट्याने वाढ झाली आहे. वाई शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, या शहरातून पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना जाणारा मुख्य रस्ता आहे. वाई शहरालगत औद्योगिक वसाहत आहे.
या सर्व गोष्टींमुळे वाई शहरात राहण्यासाठी घर घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक तसेच मुंबई-पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण वसाहतींची निर्मिती केल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. कामानिमित्त व राहण्यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
वाढती गुन्हेगारीची समस्या सर्वत्र असून, या शहरात पर्यटनासाठी राज्यातून तसेच देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक येत असतात. यामुळे शहराच्या सुरक्षा यंत्रणावरील बोजा वाढला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या अत्याधुनिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्ते व शहरातील मुख्य किसन वीर चौक, मुख्य रस्ते अशा मुख्य बारा ठिकाणी पोलीस यंत्रणेद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेला गैरप्रकार तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बँका, मोठ-मोठे व्यावसायिक, सामाजिक काम करणारी मंडळे यांनी आपल्या चौकात तसेच गल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सामाजिक दायित्व पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे.
- रमेश गलांडे, पोलीस निरीक्षक, वाई