डोंगरावरच्या शाळेत ‘सीसीटीव्ही’चा वॉच !

By Admin | Updated: November 5, 2015 00:11 IST2015-11-04T21:49:50+5:302015-11-05T00:11:18+5:30

पाटण तालुक्यातील गावडेवाडीत उपक्रम : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून उभारली यंत्रणा; ग्रामस्थांकडून कौतुक

CCTV watch on the hill school! | डोंगरावरच्या शाळेत ‘सीसीटीव्ही’चा वॉच !

डोंगरावरच्या शाळेत ‘सीसीटीव्ही’चा वॉच !

मणदुरे : कोयना जलाशय काठावर, गर्द झाडी, दुर्गम व डोंगरात तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असलेल्या गावडेवाडी, ता. पाटण येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी स्वखर्चातून ही यंत्रणा उभारली असून, सीसीटीव्ही यंत्रणा असलेली गावडेवाडी ही पाटण तालुक्यातील पहिलीच शाळा आहे. पाटण तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ व सध्या चर्चेत असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असलेले गावडेवाडी गाव पाटणपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात सातवीपर्यंत शाळा असून, एकूण चार वर्गखोल्या आहेत. सात वर्गांसाठी चार शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी आहे. या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी स्वत: ३६ हजार रुपये खर्च करून शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कल्पना ग्रामस्थ व पालकांसमोर मांडली. त्यास सर्वांनी मान्यता दिली. त्यानंतर पाटण येथील एका कंपनीस काम देत चार वर्गखोल्या व क्रीडांगण असे ६ कॅमेरे बसविण्यात आले.
याबाबत नितीन जगताप म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रातील पारंपारिक संकल्पना कालबाह्य ठरत असताना नव्या संकल्पना स्वीकारण्याची मानसिकता महत्त्वपूर्ण आहे. गुणवत्तापूर्ण दर्जेदार प्राथमिक शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम पथदर्शी आहे. स्पर्धेच्या वातावरणात गुणवत्ता हाच परवलीचा शब्द असून, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा ध्यास हाच आपल्या अस्तित्वाचा श्वास असल्याची जबाबदारी शिक्षकांनी ठेवावी. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणारी तालुक्यातील गावडेवाडी ही पहिलीच शाळा आहे. मुख्याध्यापक जाधव यांचा हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी आहे.

चिमुकले हरखले : मॉनिटरिंग सिस्टीम
गावडेवाडी शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा विद्यार्थ्यांसाठी अप्रूप बनली आहे. सीसीटीव्हीमध्ये आपण कसे दिसतो, हे पाहण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्याला ‘तू मॉनिटरिंग सिस्टीमकडे बघून ये, टीव्हीमध्ये तू कसा दिसतोस, हे मी सांगतो,’ असे विद्यार्थी सांगतात. ही नवलाई आता रोजचीच बनली आहे. दुपारी शाळा सुटली की विद्यार्थ्यांचा सीसीटीव्हीभोवती गराडा पडल्याचे पाहावयास मिळते.


शाळा परिसरात फिरणारे वन्यप्राणीही आता
होणार कॅमेराबद्ध
कोयना जलाशयाकाठी व गर्द झाडीत गावडेवाडी गाव वसले आहे. गर्द झाडीमुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. शाळा परिसरात यापूर्वी काही प्राण्यांचे दर्शनही झाले आहे. रात्रीच्या वेळी हे प्राणी शाळेच्या आवारात घुसखोरी करतात. व्हरांड्यात ते रात्रभर थांबतात. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थी व शिक्षक शाळेमध्ये आल्यानंतर आवारात प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून येतात. आता शाळेत सीसीटीव्ही बसविल्याने संबंधित प्राणीही कॅमेराबद्ध होण्याची शक्यता आहे.


विधायक व प्रामाणिकपणे काम करीत असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्या सुरक्षेबरोबर गैरप्रकारांना आळा बसावा, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून शाळेत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेमुळे दर्जेदार शिक्षणाला सुरक्षेची जोड मिळाली आहे.
- प्रकाश जाधव, मुख्याध्यापक

गावडेवाडी परिसर दुर्गम आहे. येथील शाळेत सीसीटीव्ही बसविली जाईल, असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून ही यंत्रणा उभारली. त्यांनी दाखवलेले दातृत्व वाखाणण्याजोगे आहे.
- आनंदा सपकाळ, सरपंच

Web Title: CCTV watch on the hill school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.