सुरक्षिततेसाठी गोवे गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
By Admin | Updated: June 16, 2016 00:58 IST2016-06-16T00:08:02+5:302016-06-16T00:58:31+5:30
गुन्हेगारांवर राहणार वॉच : जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत; प्रत्येक हालचालीवर लक्ष

सुरक्षिततेसाठी गोवे गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
सातारा : महामार्गालगत असलेल्या गोवे, ता. सातारा ग्रामपंचायतीने आधुनिक जगाशी नाळ जोडत आदर्श गावाकडे वाटचालीची घोडदौड सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला साथ देत ग्रामपंचायतीने सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली.
‘हा उपक्रम राबविणारी गोवे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. महामार्गालगत गोवे गाव असून, सीसीटीव्ही बसविल्याने गावात चाललेल्या प्रत्येक हालचालींवर आता लक्ष राहणार आहे. यामुळे गावात गुन्हे घडण्याचे प्रमाण निश्चित कमी होणार आहे.
महामार्गावरून लोणंद-कोरेगाव आणि पुढे जाण्यासाठी याच गावातून जावे लागत असल्याने आता गावातून जाणारा प्रत्येकजण सीसीटीव्हीत कैद होणार आहे. याचा फायदा महामार्गावर होणाऱ्या गुन्हेगारांची उकल करण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. गोवे ग्रामपंचायतीचा आदर्श लगतच्या गावांनी घेण्यासारखा आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी ‘वाय-फाय’ यंत्रणा सुरू केल्यामुळे अनेकांना गावच्या विविध विकासकामांची, प्रकल्पांची तसेच लोकांच्या कामांची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली जात आहे. मोबाईल क्रमांकावर गावचे दाखले, नोंदी आणि ग्रामस्थांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत,’ असे मत सातारा सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केले.
सरपंच आशा जाधव, ग्रामसेवक विकास चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन जाधव, पोलिस पाटील राजेंद्र जाधव, विवेक जाधव, एकनाथ जाधव, महेंद्र पवार, मधुकर जाधव, हंबीरराव जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)