सावधान... चवणेश्वरच्या डोंगरात बिबट्याचा वावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:22+5:302021-08-29T04:37:22+5:30

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चवणेश्वरच्या डोंगरात बिबट्याचा वावर वाढला ...

Caution ... Leopard roams in the mountains of Chavaneshwar! | सावधान... चवणेश्वरच्या डोंगरात बिबट्याचा वावर!

सावधान... चवणेश्वरच्या डोंगरात बिबट्याचा वावर!

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चवणेश्वरच्या डोंगरात बिबट्याचा वावर वाढला आहे. सरपंच दयानंद शेरे यांनाच बिबट्याचे दर्शन झाले आहे. या परिसरात वारंवार बिबट्या दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून, वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यात एकमेव डोंगरावर वसलेले गाव असून, निसर्गसंपदेने नटलेले आहे. घाटरस्ता, घनदाट जंगल याठिकाणी असल्याने वन्यप्राण्यांचा वावर याठिकाणी नेहमी राहिला आहे. भेकर, सायळ, खवल्या मांजर, तरस, ससा, कोल्हा, रानडुक्कर, वानर, माकड आदी प्राणी या ठिकाणी दिसून येतात. अधूनमधून या भागात बिबट्याचाही वावर दिसून येत आहे. घनदाट जंगल, पाण्याचे झरे आदींमुळे सहसा या भागात प्राणी दिसून येतात. अनेकदा शेळ्या, मेंढ्या, कुत्री, जनावरे यांच्यावर हल्ले करून हे प्राणी आपली उपजीविका भागवतात.

चवणेश्वर हे धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने याठिकाणी कायम भाविक येत असतात. महिन्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास संतोष पवार व संतोष गाडे यांना चवणेश्वर घाटात बिबट्याचे दर्शन झाले होते. याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाने गावास भेटही दिली. मात्र त्यानंतर गुरुवारी सरपंच दयानंद शेरे व माजी सरपंच सुरेश सूर्यवंशी हे दुचाकीवरून जात असताना त्यांना घाटात बिबट्या दिसला आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांना तत्काळ कल्पना दिली आहे. देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी याठिकाणी येताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने हरिदास शेरे, बजरंग पवार, युवराज शेरे यांनी केले आहे.

(कोट)

चवणेश्वर घाटात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, वनविभागाने या भागात शोधमोहीम राबवण्याची गरज आहे. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ, भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण असून, वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे. ग्रामस्थ, परिसरातील नागरिक व भाविकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

- दयानंद शेरे, सरपंच, ग्रामपंचायत चवणेश्वर

Web Title: Caution ... Leopard roams in the mountains of Chavaneshwar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.