सावधान... जिल्ह्यात वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:51+5:302021-09-17T04:45:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आटोक्यात येत असताना डेंग्यू, चिकुुनगुनिया व काविळीचे रुग्ण वाढू लागल्याने ...

Caution ... grew in the district | सावधान... जिल्ह्यात वाढला

सावधान... जिल्ह्यात वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आटोक्यात येत असताना डेंग्यू, चिकुुनगुनिया व काविळीचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुुखी पुन्हा एकदा वाढली आहे. सध्या जिल्ह्यात डेंग्यू व चिकुुनगुनियाचे मिळून ३५० हून अधिक रुग्ण आहेत. या डेंग्यूने सातारा शहरवासीयांची देखील झोप उडविली आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र, अद्यापही संक्रमण काही कमी झालेले नाही. आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र झटत असताना आता डेंग्यू, चिकुुनगुनिया, मलेरिया, कावीळ अशा साथरोगांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, खंडाळा, पाटण व फलटण तालुक्यात अशा रुग्णांची संख्या अधिक आहे.

जिल्हा हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी सातारा शहरात सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जात आहे. हिवताप विभागाचे साथरोग प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नाही. वारंवार आवाहन करूनही नागरिक घर व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे.

(चौकट)

रोज किमान आठ नवे रुग्ण

सातारा जिल्ह्यात कोरोना पाठोपाठा डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. दररोज आठ ते दहा नवे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढत चालली आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, फलटण या तालुक्यात डेंग्यू रुग्णसंख्या अधिक आहे.

(चौकट)

काय आहेत लक्षणे...

डेंग्यू : डेंग्यू झालेल्या रुग्णाला सांधेदुखीचा अधिक त्रास होतो. घसा दुखतो. रुग्णाला ताप येतो व डोकेदुखीचा त्रास होतो. दोन ते सात दिवसांपर्यंत रुग्णाला हा त्रास जाणवू शकतो.

चिकुनगुनिया : रुग्णाला अधिक अशक्तपणा येतो. हळूहळू सांधेदुखीचा त्रास वाढतो. डोळ्यांमध्ये जळजळ वाढते. तीव्र डोकेदुखी अशी चिकुनगुनियाची लक्षणे आहेत.

कावीळ : उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणे ही काविळीची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणे कायम राहतात.

(चौकट)

लहान मुलांचे प्रमाण कमी

हिवताप विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील डेंग्यू व चिकुनगुनिया बाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वाधिक रुग्ण हे २५ ते ४५ वयोगटातील आहेत. ठिकठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याने बहुतांश रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे होत आहेत.

(कोट)

सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे डेंग्यू व चिकुुनगुनियाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. डेंग्यू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, रुग्णांना जलद आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. नागरिकांनी देखील घर व परिसराची स्वच्छता ठेवून आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

(चौकट)

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

डेंग्यू २५८

चिकुनगुनिया १३२

कावीळ ४४

Web Title: Caution ... grew in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.