सावधान, खटावमध्ये कोरोना वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST2021-04-07T04:39:30+5:302021-04-07T04:39:30+5:30
खटाव : कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमावली व निर्बंधाचे ...

सावधान, खटावमध्ये कोरोना वाढतोय!
खटाव : कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमावली व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे.
खटावमध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनामास्क बेफिकीरपणे फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये २० जणांकडून प्रत्येकी २०० रुपये तर काही दुकानांमधून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास आल्यामुळे तीन दुकानदारांवर प्रत्येकी २००० रुपये दंडात्मक कारवाई करत प्रशासनाच्या कडक नियमावली व निर्बंधाचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल यांच्या सूचनाही देण्यात आल्या. अचानक पोलीस पथकाच्या येण्यामुळे मात्र विनामास्क फिरणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. स्थानिक प्रशासनापेक्षा पोलीस यंत्रणेकडून उचलण्यात आलेल्या या पावलामुळे नागरिकांना बेफिकीरपणे वागल्यास काय होते याचा अनुभव येत असतानाच २० रुपयांच्या मास्कच बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक व्यापाऱ्यांनी परत एकदा ग्राहकांसाठी नियमाचे उल्लंघन होणार नाही, अशा पद्धतीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. तर विनामास्क फिरून कोरोनाला निमंत्रण देऊ नका, जे कोणी नियमांचे उल्लंघन करतील त्याच्यावर अशीच कारवाई करण्यात येईल, असे पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले.
०६खटाव
खटावमध्ये दुकानदारांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याबद्दल कारवाई करताना पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे आदी उपस्थित होते.