सातारा : जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवात बीम लाइटला प्रतिबंध केला असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आठ मंडळांनी बीम लाइट गरागरा फिरवून गणेशभक्तांचे अक्षरश: डोळे दिपवले. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्याद दिली असून, एकूण आठ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा शहरातील राजलक्ष्मी टाॅकीजसमोरील रस्त्यावरून करंज्याचा राजा या गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सुरू होती. या मंडळासमोर अजिंक्य लाइट कोडोलीच्या मालकाने बीम लाइट लावून प्रतिबंध आदेशाचा भंग केला. याबाबत हवालदार गणेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.शकुनी गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर विजय गणेशोत्सव मंडळ, गुरुवार पेठ, सातारा या मंडळासमोर सूरज मुसा आत्तार (रा. नांदगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यांनी बीम लाइट लावून आदेशाचा भंग केला. पोलिस काॅन्स्टेबल धीरज मोरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.राजवाडा परिसरातील गोलबागेजवळ मोरे काॅलनीतील शिवनगर उत्सव मंडळासमोर काेरेगाव येथील साई लाइट्सच्या मालकाने बीम लाइट लावून आदेशाचे उल्लंघन केले. हवालदार दीपक पोळ यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कमानी हाैदाजवळील रस्त्यावर बालदत्त गणेश मंडळा, गुरुवार पेठ, सातारा या मंडळासमोर एस. लाइट्सच्या मालकाने रितेश खरात (रा. शिरवळ) याने बीम लाइट लावून उल्लंघन केले. हवालदार गणेश जाधव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.राजलक्ष्मी टाॅकीजसमोरील रस्त्यावर बालदत्त गणेश मंडळ गुरुवार पेठ, सातारा या मंडळासमोर एस लाइट्सचे मालक वरद देशमुख (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने बीम लाइट लावून आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत हवालदार धीरज मोरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवार पेठ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गणेशोत्सव मंडळासमोर श्री गणेश लाइटचे मालक अमित कदम (रा. आरळे, ता. सातारा) याने बीम लाइट लावून आदेशाचे उल्लंघन केले. हवालदार सागर निकम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रविवार पेठेतील श्री गणेशोत्सव क्रीडा मंडळासमोर राहुल बनसोडे (रा. रविवार पेठ, सातारा) याने बीम लाइट लावून आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी हवालदार धीरज मोरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.तालीम संघासमारोल रस्त्यावर श्री एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, करंजे पेठ या मंडळासमोर श्री गणेश लाइटचे मालक यश भोसले (रा. एकसळ, ता. कोरेगाव) याने बीम लाइट लावून आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत हवालदार सागर निकम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
निक्षून सांगूनही आदेशाचे उल्लंघन..गणेशोत्सव आगमनापूर्वी प्रशासनाने गणेश मंडळांच्या बैठका घेऊन बीम लाइटला मिरवणुकीत प्रतिबंध आहे. असे निक्षून सांगितले होते. मात्र, तरीही अनेक मंडळांनी पोलिसांचा आदेश धुडकावून बीम लाइट फिरवलेच.