सावधान...रात्र ‘लक्ष्मीदर्शना’ची
By Admin | Updated: October 12, 2014 23:30 IST2014-10-12T21:20:45+5:302014-10-12T23:30:08+5:30
प्रचाराची आज सांगता : उमेदवार, कार्यकर्त्यांवर प्रशासनाची करडी नजर

सावधान...रात्र ‘लक्ष्मीदर्शना’ची
सातारा : जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात जेवणावळी सुरू झाल्या आहेत. त्यातच प्रमुख उमेदवारांनी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ देण्यासही सुरुवात केल्याची चर्चा जोरात सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. परिणामी उमेदवार आणि राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराची सांगता सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. बुधवारी, दि . १५ रोजी मतदान होणार असून, रविवार, दि. १९ रोजी मतमोजणी आहे. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या असून, आता चौथी फेरी सुरू आहे. रविवारी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांच्या सांगता सभा मतदारसंघातील प्रमुख शहर आणि गावांमध्ये झाल्या. यावेळीही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जेवणावळी सुरू झाल्या आहेत. या जेवणावळींचा खर्च लाखोंच्या घरात असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, फलटण, वाई, माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण हे आठ विधानसभा मतदारसंघ असून, एकूण उमेदवारांची संख्या ८७ उमेदवार इतकी आहे. सर्व मतदारसंघाचा विचार करता कऱ्हाड दक्षिण आणि माणची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. आठ विधानसभा मतदारसंघांत एकूण २,९५० मतदान केंद्रे आहेत. मतदान यंत्रे आणि कर्मचारी पोहोचविण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. (प्रतिनिधी)
भरारी पथक रिकाम्या हातांनी परत
निवडणूक कालावधीत नियुक्त केलेल्या भरारी पथकाने रविवारी जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील यांच्या शिवथर येथील निवासस्थानी धाड टाकली; मात्र काहीच सापडले नसल्यामुळे भरारी पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. साबळे-पाटील यांच्या निवासस्थानी दुपारी साहित्य व्यवस्थापन नोडल अधिकारी शमा ढोक-पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भरारी पथक पोहोचले आणि तपासणी सुरू झाली. जवळपास अडीच तास तपासणी चालली होती. घरातील प्रत्येक कोपरा, डबे आणि धान्याची पोती पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. साबळे-पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी याची माहिती विचारली असता त्यांना काही सांगण्यात आले नाही. मात्र पथक रिकाम्या हाताने परतल्याची चर्चा चांगलीच रंगली.