कार पलटताच मदतीला धावली भोसलेवाडी
By Admin | Updated: February 18, 2015 23:48 IST2015-02-18T22:47:51+5:302015-02-18T23:48:54+5:30
पाच जखमी रुग्णालयात कोर्टी येथील अपघातात एक ठार

कार पलटताच मदतीला धावली भोसलेवाडी
उंब्रज : पुणे-बंगळूर महामार्गावर कोर्टी गावाच्या हद्दीत कारचा टायर फुटला रात्रीच्या अंधारात झालेल्या या अपघातात कोर्टी व भोसलेवाडीचे ग्रामस्थ मदतीला धावून आले. अपघातात एक जीव गेला पण पाच जण वाचले. कार महामार्गावरून उपमार्गावर आली. कार पलटी घेतल्याने गाडीतील एकजण गाडीच्या खिडकीतून उपमार्गावर फेकला गेल्याने जागीच ठार झाला. तर पाच गंभीर जखमी झाले. दरम्यान, काही अंतरावर असलेल्या युवकांनी जखमींना तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात पोहोचविले. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारचा (एमएच ११ वाय १७१) टायर कोर्टी गावाजवळ फुटला. कार सुमारे १५ फूट खाली उपमार्गावर कोसळली. तोपर्यंत कार पूर्ण फिरली होती. या दरम्यानच कारमधून अक्षय जगदीश संघवी (वय १५, रा. गुरुवार पेठ) हा खिडकीतून बाहेर फेकला गेला. सुमारे वीस फूट लांब फेकल्यामुळे तो जागीच ठार झाला. दरम्यान, या घटनेनंतर मोठा आवाज झाला. भोसलेवाडी फाट्यानजीक असलेले युवक विशाल भोसले, सनी भोसले, सचिन भोसले, गणेश भोसले, विठ्ठल तलवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.विशाल भोसले व त्यांच्या मित्रांनी कारमधील संघवी कुटुंबीयांना प्रथम बाहेर काढले. विशाल भोसले यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन केला. व पोलिसांनाही याची माहिती दिली. घटनास्थळी तत्काळ रुग्णवाहिका आली. तोपर्यंत या युवकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील संघवी कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना त्यात बसवून कऱ्हाड येथील रुग्णालयात आले.
या अपघातात चालक विजय भाऊसाहेब म्हेत्रे (वय २३, रा. शुक्रवार पेठ, कऱ्हाड), जगदीश शांतीलाल संघवी, चंदन जगदीश संघवी (वय ३२), पायल जगदीश संघवी (वय १३), सुजल जगदीश संघवी (वय ८, सर्व रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
कोर्टी, भोसलेवाडी ग्रामस्थांची माणुसकी
कोर्टी ग्रामस्थ व भोसलेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे जखमींना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. अशीच सामाजिक बांधिलकी समाजाकडून अपेक्षित असते.
लोकमत
इनिशिएटीव्ह