शेतात गांजा लावण्यास परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:49+5:302021-09-02T05:24:49+5:30
सातारा : शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे, तसेच शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाने एक एकर गांजा लावण्याची परवानगी द्यावी, ...

शेतात गांजा लावण्यास परवानगी द्यावी
सातारा : शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे, तसेच शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाने एक एकर गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील शेतकरी सुनील संपत मोरे यांनी प्रशासनाला केली आहे.
याप्रकरणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी तारगाव येथे स्वतःच्या मालकीची गटनंबर १ हजार २७२ ही जमीन असून, या क्षेत्रात एक एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी. शेतात कोणतेही पीक केले तरी त्याला रस्ता नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण होऊन बसले आहे. मशागतीसाठी केलेला खर्चदेखील मिळत नाही. शेतीला रस्ता नसल्यामुळे व कांद्याला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या नमूद गटांमध्ये एक एकर गांजा लावण्याची परवानगी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत लेखी स्वरूपात द्यावी, अन्यथा २ ऑक्टोबर या दिवशी प्रशासनाकडून परवानगी मिळाली, असे गृहीत धरून मी गांजा लागवड करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तर त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे देखील या निवेदनात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील अशाचप्रकारची मागणी केली होती. शेतात गांजा लावला, तर तो ज्या दराने विकला जातो तसेच त्याला ग्राहक असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र पारंपरिक तसेच फळभाजी पिके घेऊन त्या पिकांना दर मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागते. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी गांजा लावण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे पुढे येत आहे.