‘बफर झोन’ रद्द करा; अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: October 30, 2015 23:22 IST2015-10-29T23:24:11+5:302015-10-30T23:22:08+5:30
आठ गावांची मागणी : वनकार्यालय ढेबेवाडीतच असावे

‘बफर झोन’ रद्द करा; अन्यथा आंदोलन
सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय पाटणला हलविण्यात आले आहे. ते परत ढेबेवाडीत स्थलांतरीत करावे. बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामस्थांना त्यातून वगळावे अन्यथा मोठे जनआंदोलन करू, असा इशारा ढेबेवाडी विभागातील आठ गावांतील शेतकऱ्यांनी दिला आहे.
ढेबेवाडी विभागातील आठ गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने अन्याय केला असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. बफरझोनमधून आम्हाला वगळावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
तसेच ढेबेवाडी येथील प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्रही वन्यजीव विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. कार्यालय पाटणला असल्याने ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थांना पाटणला हेलपाटे मारावे लागत आहेत.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा शासनाने विचार करावा व पाटण-कऱ्हाडचा काही भाग ढेबेवाडीला जोडून घ्यावा. ढेबेवाडीचे कार्यालय पुन्हा ढेबेवाडीतच सुरू करावे अशी मागणी ढेबेवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या या गावातील ग्रामस्थांपर्यंत शाश्वत विकास कधी पोहोचणार या आशेने हे ग्रामस्थ प्रत्येक दिवस जगत आहेत.
अशातच शासनाने बफरझोनमध्ये समाविष्ट केल्याने या गावांच्या विकासाला हा झोन आड येत असल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. (वार्ताहर)
शासनाने आम्हाला विचारात न घेता अमच्यावर बफर झोन लादत आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. बफरझोन मधून शासनाने वगळावे अन्यथा मोठे जनआंदोलन आम्ही ग्रामस्थ करू.
-रवींद्र रेठरेकर, ग्रामस्थ, जिंती
ढेबेवाडी विभागातील वनकार्यालय वनसंपत्तीच्या रक्षणासाठी व जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ढेबेवाडीचे कार्यालय पुन्हा ढेबेवाडीत सुरू करावे व पाटण, कऱ्हाड रेंजचा काही भाग ढेबेवाडीला जोडून घ्यावा.
-अभिजित पाटील, सरचिटणीस, जिल्हा युवक काँग्रेस