देवधर्मासाठी आलो; पण...
By Admin | Updated: January 23, 2015 23:37 IST2015-01-23T21:20:51+5:302015-01-23T23:37:37+5:30
जखमींनी मांडली व्यथा : जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाइकांनी फोडला हंबरडा

देवधर्मासाठी आलो; पण...
सातारा : इस्लामपूर येथील धनगर गल्लीत राहणारे अनेकजण मोलमजुरी करून जगतात. अनेकजण काम एके काम करून दिवस काढतात. त्यांचे कष्टाचे काम पाहून आजूबाजूची मंडळी म्हणायची, ‘रोज कामाला जाता... जरा देवधर्म करत जा... सारखे कामातच खपणार का...’ मग धनगर गल्लीतील काही महिलांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात जायचे ठरवले. मात्र, घडले उलटेच. दर्शन तर झालेच नाही; उलट एक जीव गेला आणि २२ जण जखमी झाले.जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या धोंडूबाई बाबा कोळेकर उपचार सुरू असतानाच वेदनामय चेहरा करून हा किस्सा सांगत होत्या. शेजारीच उपचार घेणाऱ्या धोंडूबाई सयाप्पा शेंडगे यांनी त्यांची री ओढली. जावळी तालुक्यातील फळणी गावच्या हद्दीत असणाऱ्या आपटीच्या वळणावर खासगी प्रवासी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर १७ महिला आणि एक मुलगा जखमी झाला. जखमी महिला रोजगार करून पोटाची खळगी भरतात. शेजाऱ्यापाजाऱ्याचे बोलणे, टोमणे ऐकून त्यांनी देवदर्शनास जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी असलेल्या गणेश जयंतीचे औचित्य साधून शेंबडी येथील नारायण महाराज मठाच्या माघी गणेशोत्सवाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहाटे त्यांनी इस्लामपूर येथील धनगर गल्ली सोडली आणि सातारच्या दिशेने निघाले. पावणेआठच्या सुमारास प्रवासी बस आपटी वळणावर आली आणि अनर्थ घडला. चालकाचा ताबा सुटला आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. बसच उलटली आणि भयभीत जखमींचा आरडाओरडा सुरू झाला. ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना समजातच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मेढा पोलीस ठाणे आणि जिल्हा रुग्णालयात कल्पना दिली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील चित्र विदारक होते. वेदना सहन होत नसल्याने जखमी आरडाओरडा करत होते. गर्दीतही प्रत्येक जखमी आपल्या ओळखीचा चेहरा शोधत होता. थोड्याच वेळात इस्लामपूरहून काही मंडळी दाखल झाली. यानंतर जखमी महिलांनी हंबरडाच फोडला. अनेक जखमींच्या डोळे, डोक्याला दुखापत झाली होती. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. अनेकांचे चेहरे सुजले होते. काहीजण रडून दु:ख सांगत होते. (प्रतिनिधी)
बाबा... आई गेली...
जखमींत ओमकार उमेश करे हा चौदावर्षीय मुलगा आहे. तो आपली आई राणी हिच्यासमवेत दर्शनासाठी आला होता. वाटेत काळाने घाला घातला. ओमकारच्या आईचा जागीच मृत्यू झाला. ओमकारच्या डोळ्याच्या बाजूला थोडी दुखापत झाली आहे. काही ठिकाणी मुका मार लागला आहे. मात्र, अपघातस्थळावरील दृश्य पाहून अन्य जखमी महिलांनी ओमकारला तिथे थांबूच दिले नाही. जखमी महिलांसमवेत तो पुढे उपचारासाठी आला. त्याच्या आईचा मृतदेह घटनास्थळीच होता. ओमकार रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईलवर कोणाचे तरी सारखे फोन येत होते. याचवेळी त्याला फोन आला आणि त्याने ‘बाबा... आई गेली...’ असे सांगत हंबरडा फोडला. त्याचे सांत्वन करत राधाबाई जानकर यांनी मोबाईल आपल्या हाती घेतला आणि घटनेची माहिती सांगितली.
मेढा पोलीसही ‘अलर्ट’
आपटीचे वळण मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, हवालदार सुजीत भोसले, दौंड, निकम यांनी घटनास्थळी यंत्रणा कामाला लावली. रवींद्र तेलतुंबडे जिल्हा रुग्णालयात थांबून आढावा घेत होते.
धनगर गल्लीतील कार्यकर्ते
तत्काळ रुग्णालयात
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच इस्लामपूरच्या धनगर गल्लीतील कार्यकर्ते तत्काळ रुग्णालयात दाखल झाले.
भाऊ पाटील, रामचंद्र कोळेकर, दीपक पाटील, निवास खैरे, सुरेश सूपने, श्रीकांत टिबे ही सारी मंडळी येथे जखमी आणि त्यांच्या नातेवाइकांना धीर देत होते.
सतरा मिनिटांत ‘१०८’ घटनास्थळी...
बस उलटल्याचा निरोप आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आला आणि यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तत्काळ सज्ज झाली.
पर्यवेक्षक सुशांत नलवडे, डॉ. निंबाळकर, डॉ. कदम आणि काही कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका बरोबर सतरा मिनिटांत आपटी वळणावर दाखल झाली आणि जखमी महिलांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.