सातारा : रघुनाथ वामन मनवे लाच प्रकरणात सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती राजू भोसले यांची चौकशी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने राजू भोसले यांना पत्र पाठवून चौकशीला उपस्थित राहा, असे बजावले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, या पत्राविषयी अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी हे पत्र राजू भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले आहे. शुक्रवारी याचा उलगडा झाला. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव रघुनाथ वामन मनवे यास लाचलुचपत विभागाने मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. मनवे लाच प्रकरणात ज्या तक्रारदाराची फिर्याद होती, त्याने दिलेल्या जबाबानुसार मनवे याने पैसे घेताना राजू भोसलेंच्या नावाचा उल्लेख केला होता. मनवे याने यापूर्वी स्वत:साठी आणि तत्कालीन सभापती राजू भोसले यांच्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने फिर्यादीत केला होता.सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक असला तरी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आणि त्यातील जबाब लक्षात घेता तत्कालीन सभापती राजू भोसले यांची चौकशी करणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकारांना दिली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी पैसे देण्याचा विषय निघाला त्यावेळी मनवे याने बाजार समिती चेअरमनलाही पैसे द्यावे लागतात, असा उल्लेख केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून सांगण्यात आले होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजू भोसलेंना बजावलेल्या पत्रात म्हटले आहे की, बाजार समिती लाच प्रकरणात संशयितांने आपल्या नावाचा उल्लेख केला आहे, असे तक्रारदाराच्या अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करावे.’ (प्रतिनिधी)
राजू भोसले यांना चौकशीला बोलाविल
By admin | Updated: December 12, 2014 23:44 IST