पाटणमध्ये मंत्रिमंडळ; पण पाटणला मंत्रिपद केव्हा?
By Admin | Updated: November 20, 2015 00:14 IST2015-11-19T22:05:57+5:302015-11-20T00:14:05+5:30
कार्यकर्त्यांना लागले वेध : गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्हा लाल दिव्यापासून वंचित

पाटणमध्ये मंत्रिमंडळ; पण पाटणला मंत्रिपद केव्हा?
पाटण : राज्याच्या निर्मितीनंतर नेहमीच सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना लालदिवा मिळाला; पण गेल्या एक वर्षापासून सातारा सत्तेपासून वंचितच राहिला आहे. याची तीव्रतेने आठवण होण्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यात शुक्रवारी मंत्रिमंडळ येत आहे. अशावेळी राज्यात युतीचे सरकार असताना जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला मंत्रिपद केव्हा? असाच प्रश्न समोर येत आहे.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्याची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर अनेक वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले. १९६० नंतर २०१४ पर्यंत राज्याला सातारा जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिले. तसेच महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याला नेहमीच मंत्रिपदही मिळाले. त्यामध्ये बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील-उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, मदनराव पिसाळ, रामराजे नाईक-निंबाळकर, विक्रमसिंह पाटणकर आदींपासून ते आतापर्यंतच्या म्हणजे शशिकांत शिंदे यांच्यापर्यंतचा समावेश आहे.
मात्र, २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि राज्यात युतीची सत्ता आली. जिल्ह्यात युतीचा एकच आमदार निवडून आला, ते शंभूराज देसाई यांच्या रूपाने. मात्र, गेल्यावर्षी त्यांचा काही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यातच अनेक वर्षांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही परजिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला मिळाले. पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे साताऱ्याचे पालकमंत्री झाले. शिवतारे हे शिवसेनेचे आहेत.
पाटण तालुक्यातील मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहेत.
त्याचबरोबर महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदींसह १५ मंत्री पाटणला येत आहेत. अशावेळी ‘पाटणला मंत्रिमंडळ येणार; पण पाटणला मंत्रिपद केव्हा मिळणार?’ असा प्रश्न युतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात तरी आमदार शंभूराज देसाई यांना स्थान मिळणार का? याकडे जिल्ह्याचेच लक्ष लागून राहिलेले आहे. (प्रतिनिधी)
शंभूराज देसाई यांचे नावे चर्चेत होते...
२०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी पाटणमधून शंभूराज देसाई हे आमदार म्हणून निवडून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेवेळी आमदार देसाई यांचे नाव चर्चेत होते; पण पुढे काहीच झाले नाही. आता होणाऱ्या विस्तारात तरी त्यांना लालदिवा मिळणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.