साखरेला स्थिर बाजारपेठ मिळावी
By Admin | Updated: April 5, 2016 00:52 IST2016-04-05T00:52:55+5:302016-04-05T00:52:55+5:30
पृथ्वीराज चव्हाण : प्रतापगड कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता; ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन

साखरेला स्थिर बाजारपेठ मिळावी
सातारा : ‘ऊस पिकविणारा शेतकरी व या उसावर प्रक्रिया करून साखर उत्पादन करणारा सहकारी साखर उद्योग हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या साखर उद्योगाचे अर्थकारण बाजारातील साखरेच्या भावावर तर या भावावर शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर अवलंबून असतो. यासाठी केंद्र व राज्य सरकारने उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) मध्ये व्यवहारीकता आणून साखरेला स्थिर बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घेतलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीचे विधिवत पूजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सहकारी साखर उद्योग हा सहकार चळवळीचा पाया आहे. आघाडी शासनाच्या काळात सहकारात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्याचे खासगीकरण केले. त्याचवेळी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व सहकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजारी सहकारी साखर कारखाने सहकारात ठेवण्याची भूमिका मी घेतली. त्यातूनच प्रतागपड व खंडाळा साखर कारखाना सहकारात जिवंत राहिला. मदन भोसले यांनी थोरल्या भावाच्या भूमिकेतून प्रतापगड तर सक्षमपणे चालविलाच, शिवाय खंडाळा कारखाना लवकरच सुरू होत आहे.’
मदन भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालकीच्या प्रतापगड कारखान्यामध्ये चार हंगाम आम्ही
अडचणीत सापडला तरी शेतकरी, हितचिंतक, ऊस तोडणी मजूर, वाहनधारक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे यशस्वी झाला.
प्रारंभी पृथ्वीराज चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते चार लाख, एकशे अकरा साखरपोत्यांचे पूजन करण्यात आले.
प्रतापगडमध्ये चालू गळित हंगामात दैनंदिन सरासरी २,७१५मेट्रिक टनाने १३५ दिवसांत ३ लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के मिळाला. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टर गाडीवान व बैलगाडीवान यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तिन्ही कारखान्यांचे सभासद शेतकरी, मजूर, कर्मचारी उपस्थित होते.