पर्यटकांना खुणावतेय फुलपाखरू उद्यान
By Admin | Updated: August 27, 2015 23:02 IST2015-08-27T23:02:00+5:302015-08-27T23:02:00+5:30
उद्घाटन उत्साहात : प्राण्यांची शिल्पे, जैवविविधतेचे फलक पाहण्यास उपलब्ध

पर्यटकांना खुणावतेय फुलपाखरू उद्यान
ढेबेवाडी : भोसगाव, ता. पाटण येथे उभारण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू उद्यान आणि निसर्ग पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. वनअधिकारी आणि भोसगाव येथील वनसंरक्षक समितीच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भोसगावनजीक वनविभागाच्या विश्रामगृहानजीक अनेक दिवसांपासून निसर्ग पर्यटन केंद्र उभारणीचे काम चालू होते. पर्यटनतज्ज्ञ रमन कुलकर्णी व आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या केंद्रात फुलपाखरू उद्यानासह जैवविविधता विषयक माहिती फलक, वन्य प्राण्यांची शिल्पे, त्यांच्याबाबतची माहिती, निसर्ग पायवाट आणि माहिती, पश्चिम घाटात आढळणाऱ्या वनस्पती यासह पैगोडामधून निसर्ग पाहण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या केंद्राचे उद्घाटन सहायक वनरक्षक विनायक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल किरण कांबळे, कोल्हे, वनसंरक्षक समिती अध्यक्ष प्रतापराव देसाई, तात्यासाहेब देशमुख, उपसपंच जयश्री देशमुख, मुख्याध्यापक जगन्नाथ जानुगडे, वनपाल सुनील कोळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुळे म्हणाले, ‘वाल्मीक खोऱ्यात उभारण्यात आलेल्या या पर्यटन केंद्रामुळे पर्यटकांसह जनतेलाही जैवविविधतेची माहिती मिळण्यास मदत मिळेल, याशिवाय दुर्मिळ पशुपक्ष्यांची येथे शिल्पे असल्याने तरुणांसह शैक्षणिक सहलींसाठी आकर्षण निर्माण होईल.’ यावेळी प्रतापराव देसाई यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. सरपंच जयश्री देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)