घरफोडी, दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: February 27, 2017 00:01 IST2017-02-27T00:01:06+5:302017-02-27T00:01:06+5:30
अकरा गुन्ह्यांची कबुली; दोन लाखांचा ऐवज जप्त; शहर पोलिसांची कारवाई

घरफोडी, दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
सातारा : शहर व परिसरात घरफोडी, पर्स चोरी, दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला. या टोळीने तब्बल ११ गुन्ह्यांची कबुली दिली असून, दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.
राहुल पंडित सगट (वय २५), सागर रामा खुडे ऊर्फ वाकळ (२६, रा. प्रतापसिंहनगर, सातारा), सत्यम संजय मोरे (२१, रा. खावली, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे तिघे दुचाकीची चोरी करण्यासाठी विसावा नाका येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला सतर्क केले. या पथकाने विसावा नाका येथे सापळा लावला. त्यावेळी तिघांनाही पकडण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी अकरा गुन्ह्यांची कबुली दिली. शहरातील पाच मोबाईल शॉपी, सात घरफोड्या, तीन दुचाकी, एक पर्स चोरी अशा गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश
आहे.
तीन दुचाकी, १४ मोबाईल अॅक्सेसरीज असा सुमारे दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.
या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार लियाकत शेख, हवालदार संतोष इष्टे, प्रवीण फडतरे, संतोष महामुनी, गणेश चवरे, नीलेश काटकर, नीलेश गायकवाड, प्रदीप मोहिते, पंकज ढाणे, सोमनाथ शिंदे, शिवाजी भिसे यांनी सहभाग घेतला.