अनफळे धोंडेवाडी शिवारात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:56+5:302021-08-25T04:43:56+5:30
मायणी : धोंडेवाडी हद्दीत अनफळे गावानजीक रायगुडे मळा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या ...

अनफळे धोंडेवाडी शिवारात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती
मायणी : धोंडेवाडी हद्दीत अनफळे गावानजीक रायगुडे मळा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी चार बैल, एक छकडा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बेकायदेशीर बैलगाड्या शर्यत आयोजित केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक केली आहे.
याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, धोंडेवाडी हद्दीतील अनफळे गावानजीक रायगुडे मळा नावाच्या शिवारामध्ये पुन्हा बैलगाड्या शर्यत आयोजित केली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे मायणी पोलीस दूरक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, नानासाहेब कारंडे, योगेश सूर्यवंशी मिळालेल्या घटनास्थळी पोहोचले.
त्या ठिकाणी बैलगाडी मालकांनी बैलगाड्यांची शर्यत सुरू केली होती. पोलीस आल्याची माहिती मिळताच बैलगाडी मालक बैलगाड्या व बैले घेऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून चार बैल, छकडा गाडी ताब्यात घेतली; तर बैलगाडी शर्यत आयोजक अजित मंडले (वय २१), तुळशीराम जाधव (२२), उमेश गोदावले, (२५), प्रशांत पाटोळे (२२), संदीप जाधव (२३), विशाल पाटील (१८), उमाजी अडके (३०, सर्व रा. अनफळे, ता. खटाव) यांना अटक केली आहे.
या सर्वांवर सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाड्या शर्यत बंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोना रोगाच्या संसर्गाच्या अनुषंगाने जमावबंदी असल्याच्या आदेशाचे उल्लंघन, प्राणी संरक्षण अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र कोरोना अधिसूचना व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमांतर्गत फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२४मायणी
अनफळे येथे बैलगाड्या शर्यती आयोजित केली होती. यातील चार बैल पोलिसांनी ताब्यात घेतले. (छाया : संदीप कुंभार)