बाजार आदर्की बुद्रुकचा, पावती खुर्दची!
By Admin | Updated: February 6, 2015 00:40 IST2015-02-05T20:22:17+5:302015-02-06T00:40:12+5:30
ग्रामसभेत पंचनामा : थकित कर वसुलीबरोबरच धोम-बलकवडीच्या पाणी विषयावर चर्चा

बाजार आदर्की बुद्रुकचा, पावती खुर्दची!
आदर्की : धोम-बलकवडीचे पाणी आदर्कीच्या ओढ्यात कायमस्वरूपी सोडण्यासाठी दरवजा ठेवणे, ग्रामपंचायत थकित कर वसुली करणे, सर्व गावात स्वच्छता अभियान राबविणे, गराटाची कामे पूर्ण करणे, या विषयांवर चर्चा सुरू असतानाच आदर्की बुद्रुक आठवडा बाजारात कर वसुली पावतीवर आदर्की खुर्द, ता. कोरेगाव असे छापले असल्याने ग्रामसभेत या कारभाराचा पंचनामा करण्यात आला.आदर्की बुद्रुकची ग्रामसभा भैरवनाथ मंदिरात सरपंच उमा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी धोम-बलकवडीचे पाणी आदर्कीच्या ओढ्यात सोडण्याचा ठराव चर्चेला आला. त्यावेळी बाळासाहेब कासार यांनी अधिकारी चाळीस हजार रुपये पाणी कर भरल्यानंतर पाणी सोडणार असल्याचे सांगितले. यावर तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी लाभक्षेत्राबाहेर पाणी जाते, त्याचा पाणी कर कोण भरते, याची माहिती ग्रामपंचायतीने मागवावी, असे सांगितले. ओढ्यावर बांधलेले सिमेंट बंधारे तीन दिवसांत रिकामे होतात, तेव्हा बंधाऱ्याची साईट चांगली निवडण्याची मागणी सागर धुमाळ यांनी केली.
ग्रामसेविका व्ही. आर. सोनावणे यांनी गेल्यावर्षीची पाच लाख रुपये कर थकबाकी आहे. कर्मचारी पगार दहा हजार व टीसीएल पावडरवर मोठा खर्च होतो. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. त्यावर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांनी कर वसुलीस मदत करावी. डॉल्बीच्या प्रश्नी डॉल्बीवर बंदी घालण्यापेक्षा आवाज कमी करण्याची सक्ती करण्याची मागणी केली.
यावेळी विश्वासराव धुमाळ, उपसरपंच मोहन खराडे, रमेश पवार, विलास धुमाळ, सर्जेराव पोळ, धोंडिराम कारंडे, विकास काकडे, के. व्ही. अनपट आदी उपस्थित होते. (वार्ताहर)