कऱ्हाड : गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये लॉकअप उपलब्ध आहेत. मात्र, लॉकअपमध्ये एक अथवा दोनच खोल्या असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना सातारा तसेच कोल्हापूरच्या कारागृहात वर्ग करावे लागत आहे.
कऱ्हाड व पाटण उपविभागातील आरोपींना ठेवण्यासाठी येथे उपकारागृह होते. मात्र, प्रशासकीय इमारत उभारताना जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीमधील उपकारागृहासह सर्व इमारत पाडण्यात आली. परिणामी, त्या जागेतील तहसील कार्यालयासह इतर सर्व शासकीय कार्यालये सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली होती. इतर कार्यालये स्थलांतरित झाली असली तरी उपकारागृहासाठी जागाच उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपकारागृहच बंद करण्यात आले. नव्याने होणाऱ्या प्रशासकीय इमारतीत हे कारागृह प्रस्तावित होते.
सध्या नवीन प्रशासकीय इमारत पूर्ण झाली आहे. त्या इमारतीत तहसील कार्यालयासह इतर विभागही सुरू झाले आहेत. मात्र, उपकारागृह अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोपींना अद्यापही सातारच्या जिल्हा कारागृहात अथवा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पाठवावे लागत आहे.
- चौकट
‘लॉकअप’ची सोय
कऱ्हाड शहर : २
कऱ्हाड ग्रामिण : २
उंब्रज : १
तळबीड : २
पाटण : २
ढेबेवाडी : २
- चौकट
पाच वर्षांपासून परवड
पोलीस कोठडीसह न्यायालयीन कोठडीतील आरोपीही यापूर्वी काही दिवस कऱ्हाडच्या उपकारागृहात ठेवले जायचे. जास्त दिवस जामीन झाला नाही, तरच त्या आरोपीला जिल्हा किंवा कळंबा कारागृहात पाठविले जायचे. मात्र, गत पाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीला जिल्हा अथवा कळंबा कारागृहाची हवा खावी लागत आहे.
- चौकट
महिला आरोपींचा प्रश्न
एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपीला अटक झाली तर त्या आरोपीला ठेवायचे कुठे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो. कऱ्हाड शहर, उंब्रज, पाटण पोलीस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये महिला आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातून त्या महिला आरोपीस इतर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये वर्ग करावे लागत आहे.
- चौकट
कोयनानगरचे आरोपी पाटणला
पाटण तालुक्यातील कोयनानगर पोलीस ठाण्यात लॉकअप असूनही ते वापरण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे कोयनानगर पोलीस ठाण्याच्या आरोपींना पाटण पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले जाते.
फोटो : १९केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक