बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसाय उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:09+5:302021-02-06T05:15:09+5:30
रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय ...

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसाय उभारावा
रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय करायचाच असेल तर बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समिती संचलित सातारा ॲॅग्रीकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना धीरज कुमार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले, शंकर कणसे, आप्पासाहेब पवार, अंकुश पवार, विनायक जाधव उपस्थित होते.
बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका प्रकल्प, कृषी सेवा केंद्र, कृषी गटाच्या अद्ययावत केलेल्या रेकॉर्डची पाहणी व प्रस्तावित असलेल्या सुमारे नऊ कोटी रुपये किमतीच्या सेंद्रिय गूळ पावडर प्रकल्पाची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली.
धीरज कुमार म्हणाले, ‘लोकांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारत असताना कृषी विभागाशी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गरजेच्या वेळी बांधावर जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी. विकेल ते टिकेल, प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना थेट ग्राहकासोबत जोडण्यावर आमचा कल आहे. नवीन मूल्य साखळी कशी निर्माण करायची, शेतीमालाची किंमत कशी वाढवायची व मधले टप्पे कमी करून थेट शेतीमाल लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.बचत गट व गटशेतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकल्पाला निधीची कमतरता जाणवणार नाही.’
फोटो : ०५पिंपरी
पिंपरी, ता. कोरेगाव येथील शेतीपूरक विविध उपक्रमांची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली. (छाया : जयदीप जाधव)