झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’

By Admin | Updated: December 29, 2014 23:42 IST2014-12-29T20:51:30+5:302014-12-29T23:42:57+5:30

साताऱ्यात म्हशींची झुंबड : हॉर्नचा आवाजही निष्प्रभ

'Buffalo Walk' on the Shocking Rajpath | झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’

झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’

सातारा : साताऱ्यातील प्रमुख मार्गापैकी राजपथावर वाहने चालविणे खूप जिकरीचे बनले आहे. जागोजागी खड्डे, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमण यातून वाट काढता-काढता वाहनधारकांची दमछाक होते. त्यातच सायंकाळी दिवे लागताच म्हशींचा कळप राजपथावरून दररोज जातो. या म्हशींना हटकविण्यासाठी हॉर्न वाजविला तरी कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही. त्यामुळे झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’ची वेळ झाली असेच बोलले जात आहे.
पोलीस करमणूकपासून कमानी हौदापर्यंत दररोज सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान जवळपास दहा ते पंधरा म्हशींचा कळप निघतो. दिवसभर चरण्यासाठी सोडलेली ही जनावरे सायंकाळी पुन्हा आपल्या गोठ्याकडे परतात. त्यांचा हा रोजचाच दिनक्रम आहे. राजपथावर नेहमी सायंकाळी सहानंतर वाहतुकीची वर्दळ असते. हजारो वाहने या मार्गाचा दररोज वापर करतात. त्यामुळे या मार्गावर रस्ता ओलांडतानाही पादचाऱ्यांना मुश्किल बनले आहे. तर दुसरीकडे याच मार्गावर काही वाहनधारक बेधडकपणे सुसाट वाहने चालवितात. त्यांच्या वेगालाही मर्यादा राहात नाही. त्यामुळे राजपथावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे; पण याच वाहनांना या म्हशींचा अडथळा निर्माण झाला आहे.
राजपथावरील दिवा बत्ती लागल्यानंतर दररोज या म्हशी कमानी हौदाजवळील गोठ्याकडे निघतात. गाड्यांचा आवाज अन् ऐटीत जाणाऱ्या म्हशी याकडे पाहून अनेकजन आश्चर्याने बघतात. ज्या मार्गावर पादचाऱ्यांना वाहनधारक जुमानत नाही तेच वाहनधारक पोलीस करमणूक केंद्रापासून कमानी हौदापर्यंत या म्हशींच्या मागे हॉर्न वाजवित वाहने चालवीतात. म्हशीही काळ्या कूट असल्याने अनेकवेळा वाहने जवळ आल्यावर म्हशी दिसतात व कचकन ब्रेक लावतात.
दरम्यान, कितीही हॉर्न वाजवा किंवा वाहने आडवी मारा आम्हाला त्याच काय, आम्ही फक्त आमचे घर गाठायचे, अशी खूणगाठच म्हशींनी या राजपथावरून जाताना जणू मारली आहे, असेच म्हणावे
लागेल. (प्रतिनिधी)

Web Title: 'Buffalo Walk' on the Shocking Rajpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.