बबलूचा गेम; बाबरवरही नेम !

By Admin | Updated: July 21, 2015 00:52 IST2015-07-21T00:41:04+5:302015-07-21T00:52:16+5:30

कऱ्हाडात टोळीयुद्ध : भरदिवसा मानेला गोळ्या घातल्या; जमावाने हल्लेखोर खानला ठेचले

Bubble game; Name on Babar too! | बबलूचा गेम; बाबरवरही नेम !

बबलूचा गेम; बाबरवरही नेम !

कऱ्हाड : गुन्हेगारी कारवायांनी शहर धुमसत असताना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंडईत ‘गँगवॉर’चा भडका उडाला. कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावरील गोळीबार प्रकरणात हात असणाऱ्या गुंड बबलू मानेवर बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पलायनाच्या प्रयत्नात असणारा हल्लेखोर बाबर खान याला जमावाने पकडून बेदम मारहाण केली. तसेच डोक्यात सिमेंटची पाईप व दगड घालून त्याला ठेचून ठार मारले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, बाबर खानने केलेल्या गोळीबारात बबलू मानेची आई अनुसया माने या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबलू ऊर्फ उमेश भीमराव माने (वय ३८, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) व बाबर शमशाद खान (रा. खुशबू मंझील, मळाईनगर, मलकापूर) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बबलू माने हा सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. घरापासून काही अंतरावर पालिकेनजीकच्या हॉटेलमध्ये तो काहीवेळ थांबला. त्यानंतर तो पुन्हा घराच्या दिशेने गेला. घरानजीकच्या चौकात तो वर्तमानपत्र वाचत बसला होता. त्यावेळी पालिकेच्या दिशेने बाबर खान त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याजवळील पिस्तुलातून बबलू मानेवर दोन गोळ्या झाडल्या. त्या त्याच्या डाव्या बाजूच्या दंडातून छातीमध्ये घुसल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बबलू माने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
याचवेळी घरातून बाहेर दुकान उघडण्यासाठी आलेली त्याची आई अनुसया या त्याठिकाणी धावल्या. त्यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने पिस्तुलातून एक गोळी अनुसया यांच्यावर झाडली. ती त्यांच्या पायाला लागली. अनुसया यासुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील युवकांसह नागरिक त्याठिकाणी जमले. या गर्दीतून दहशत माजवित बाबर खान मंगळवार पेठेच्या दिशेने निघाला. घटनास्थळापासून काही अंतरावरच त्याला युवकांनी पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत बाबर खानच्या हातून पिस्तूल खाली पडले. जमावाने त्याला बेदम मारहाण केली. तसेच नजीकच पडलेली एक सिमेंटची पाईप उचलून त्याच्या डोक्यात घातली. त्यानंतर दगडानेही त्याला ठेचण्यात आले. त्यामध्ये बाबर खान जागीच ठार झाला. ही घटना एवढी भयानक होती की, परिसरातील नागरिकांसह मंडईत खरेदीसाठी आलेल्यांचीही धावपळ उडाली. बाबर खान रस्त्यात मृतावस्थेत पडला असतानाच परिसरातील नागरिक व नातेवाइकांनी जखमी बबलू माने व त्याची आई अनुसया यांना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच बबलू मानेचा मृत्यू झाला, तर अनुसया यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. एक पथक घटनास्थळी पंचनामा करीत असताना दुसरे पोलीस पथक कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर बाबर खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील मुख्य बाजारपेठेसह मंडई व आसपासच्या उपनगरांमध्ये शांतता पसरली. या घटनेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून, अनुसया माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबर खान याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नासिर शमशाद खान यांच्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बाबरला गोळ्या घातल्या का?
बाबर खानने पूर्ववैमनस्यातून बबलू मानेचा खून केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.
मात्र, तात्कालिक कारण तसेच यामागे कोणी मास्टरमाइंड आहे का? गोळीबारावेळी बाबर खानसमवेत त्याचे अन्य साथीदार होते का? व हा हल्ला पूर्वनियोजित होता का? यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बाबर खानला त्याच्याच हातातील पिस्तूल घेऊन गोळ्या घातल्याची व त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घालून त्याला ठार मारल्याची चर्चा आहे.
मात्र, बाबर खानला गोळ्या घातल्या का? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे व त्याच्या
खूनप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
सल्या चेप्यावरील गोळीबारात बबलू माने !
कऱ्हाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात २९ आॅक्टोबर २००९ रोजी सल्या चेप्या याच्यावर गोळीबार झाला होता. त्यामधून सल्या बचावला; मात्र हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यावेळी पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्या प्रकरणामध्ये बबलू मानेसह आठजणांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आणखी एकदा दुसऱ्या टोळीकडून सल्यावर गोळीबार झाला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अद्यापही सल्यावर उपचार सुरू आहेत. असे असताना सोमवारी सकाळी बबलू मानेवर गोळीबार करण्यात आला.
कटाचा मास्टरमाइंड कोण ?
बाबर खानने बबलूचा ‘गेम’ करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमवारी ज्या पद्धतीने बबलूवर गोळ्या झाडल्या त्यावरून हा पूर्वनियोजित कट असावा, त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. हा हल्ला बाबरने स्वत: केला की, त्यामागे कोणी मास्टरमाइंड आहे? याचाही शोध घेत आहोत, असे डॉ. देशमुख म्हणाले.

Web Title: Bubble game; Name on Babar too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.