ब्रिटिशकालीन पुलाला ‘बांधकाम’ची मलमपट्टी!
By Admin | Updated: November 11, 2015 23:48 IST2015-11-11T21:20:17+5:302015-11-11T23:48:40+5:30
जुन्या कोयना पुलाला नव्याने रंगरंगोटी : १४६ वर्षांचे पुलाचे अवशेष; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल

ब्रिटिशकालीन पुलाला ‘बांधकाम’ची मलमपट्टी!
कऱ्हाड : शंभरहून अधिक वर्षे पूर्ण झालेल्या व डागडुजीअभावी प्रत्येक परिस्थितीशी झुंज देत असलेल्या कऱ्हाड येथील कृष्णा- कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करण्यात आली आहे. १८७२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाच्या संरक्षक दगडी कठड्यास रंगरंगोटी करण्यात आली असून, पुलावरील रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुलाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली तरी अद्यापही कोल्हापूर पुरातत्त्व विभागातर्फे कोणत्याही स्वरूपाची दखल घेण्यात आलेली नाही. ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी कोयना नदीवरील या ब्रिटिशकालीन पुलाच्या स्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पुलाच्या सद्य:स्थितीबाबत माहितीही दिली होती.
पुलाच्या संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था गेलेला रंग, गंजलेले लोखंडी अवशेष तसेच परिसरातील दुर्गंधीबाबत सद्य:परिस्थिती मांडली असता, सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेने पुलाच्या परिस्थितीकडे लक्ष दिले आहे. तसेच पुलावरील रस्त्यावर पडलेलेल्या खड्ड्यावर खडी टाकण्यात आली आहे.
पूर्वीच्या काळात पाटणला कऱ्हाडशी जोडणारा मार्ग म्हणून या कोयना नदीवरील पुलास ओळखले जात असे.
या कोयना नदीवरील पुलाच्या बांधकामास जुलै १८५६ मध्ये सुरुवात करण्यात आली. लोखंडी तुळ्या अन् दगडांच्या साह्याने बांधकाम करण्यात आलेला हा पूल १ मे १८७२ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बांधण्यात आलेल्या एकूण आठ कमानींपैकी चार कमानी या दगडांच्या साह्याने बांधण्यात आल्या आहेत.
१४६ वर्षे पूर्ण झालेल्या हा पूल त्या काळात वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलाशेजारी एक नवा उंच, रुंद व भक्कम पूल कोयना नदीवर १९ मे १९७४ साली बांधण्यात आला. त्यानंतर अलीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या योजनेत या पुलाचेही विस्तारीकरण करण्यात आले.
वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या जुन्या कोयना पुलाचा वापर हा पादचारी पथमार्ग म्हणून केला जात आहे. बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलास आता २०१५ मध्ये १४६ वर्षे पूर्ण झाले आहेत. नुकतेच या पुलाच्या दगडी बांधकाम असलेल्या कठड्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच पुलावरील रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली आहे. पुलाच्या सुधारणेकडे शासनाने काही प्रमाणात लक्ष दिले असल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. पूर्वी या पुलाची दयनीय अवस्था झाली होती. नागरिकांकडून डागडुजीची मागणी होत होती. (प्रतिनिधी)
पुलाखालील पायऱ्यांची स्वच्छता
कृष्णा-कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलावरून शहरातील लोकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कचरा टाकला जातो. पुलावरून टाकण्यात आलेल्या कचऱ्यापैकी काही कचरा हा नदीपात्रात पडतो, तर काही पुलाखाली. पुलाखाली पडणाऱ्या कचऱ्यामुळे त्या ठिकाणी पायऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. या ठिकाणी साचत असलेला कचरा हा हटविल्याने परिसर स्वच्छ झाला आहे. पुलालगत दैत्यनिवारणी देवीचे मंदिर असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
‘बांधकाम’ कडून डागडुजी पुरातत्त्व विभागाकडून कधी ?
कृष्णा-कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचे अवशेष कोल्हापूर येथील पुरातत्त्व विभागाने तपासणीसाठी नेले होते. वर्षपूर्ण होऊनही अद्याप कोणत्याही स्वरूपाची दखल पुरातत्त्व विभागाकडून घेण्यात आली नाही. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या कठड्याची रंगरंगोटी व रस्त्याची डागडुजी केली गेली आहे.
ब्रिटिशकालीन पुलाला
रंगकामामुळे ‘झळाळी’
कऱ्हाड येथे ब्रिटिशकालीन पुलाच्या संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. कठड्यावरील रंग गेला होता. तसेच कठड्यांची झीजही झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यावर सफासफाई करून रंगकाम केल्याने दगडी कठडे आकर्षक दिसू लागले आहेत.
ब्रिटिशकालीन पूल हा कऱ्हाडमधील ऐतिहासिकच ठिकाण आहे. या पुलामुळे कऱ्हाडची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेला हा पूल आजही चांगल्या अवस्थेत असल्याने त्याकाळातील तंत्रज्ञान कशाप्रकारचे असेल, हे या पुलावरून समजते.
- विवेक ढापरे,
सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड