लोणंद : ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे जिल्ह्यात शुक्रवार, दि. २७ रोजी आगमन होत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. मात्र, नदी कोरडी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडले आहे. दरम्यान, लोणंदचा पालखीतळ विद्युत रोषणाईने झगमगला आहे.‘साधुसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा’ याप्रमाणे दरवर्षी ज्ञानोबा माउलींची पालखी अन् वारकऱ्यांचे स्वागत केले जाते. जिल्ह्यात प्रवेश करत असताना माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाते. वारकऱ्यांच्या दृष्टीने या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत केल्यानंतर लोणंद मुक्कामी स्थिरावते. सातारा जिल्ह्यात मान्सूनने दडी मारली आहे. यामुळे वीर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे नीरा नदी कोरडी पडल्याने माउलींच्या पादुका व वारकऱ्यांच्या स्नानाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘कैसे करावे नीरास्नान... यक्षचि प्रश्ने’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वीर धरणातील सातशे क्युसेक उर्वरित पाणी धरण व्यवस्थापनाने नीरा नदीत सोडले. हे पाणी आज (गुरुवारी) दुपारी लोणंद हद्दीत आले. लोणंद शहरातही सध्या पाणीटंचाई भासत आहे. या पाण्यामुळे लोणंदमध्ये पाण्याची सोय होणार आहे. ग्रामपंचायतीवरील ताण यामुळे कमी होणार आहे. हेच पाणी पुढे अडीच दिवस लोणंद मुक्कामी येत असलेल्या वारीतील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोणंद ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याअंतर्गत विविध भागात विद्युत दिवे लावण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, वीजवितरणचे सहायक अभियंता मोहन सूळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेळके, गीतांजली क्षीरसागर, भरत बोडरे, तुकाराम क्षीरसागर, अनुप्रिता शेडे, ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर उपस्थित होते. (वार्ताहर)
उजळला लोणंदचा पालखीतळ !
By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST