एलईडीच्या शुभ्र प्रकाशानं उजळला अवघा सातारा!
By Admin | Updated: April 17, 2016 00:33 IST2016-04-17T00:32:05+5:302016-04-17T00:33:03+5:30
दीड हजार दिवे बसविले : दुसऱ्या टप्प्यांत अंतर्गत पेठांमध्ये दिवे बसविणार

एलईडीच्या शुभ्र प्रकाशानं उजळला अवघा सातारा!
सातारा : सातारा पालिकेने एलईडी सिटी होण्याचा पहिला मान मिळविला असून, निम्मे शहर आता एलईडीच्या झगमगाटात बुडून गेले आहे. अजिंक्यतारा व यवतेश्वरवरून सातारा शहराचे दृश्य रात्री पाहण्यासारखे आहे. एलईडी सिटीमुळे शहराने डायमंड नेकलेस घातल्याचे दिसत आहे.
सातारा पालिकेने एलएईडी सिटी होण्याचा पहिला मान मिळविला आहे. ‘लोकमत’ने सातारा सिटी ही एलएईडी सिटी होणार असल्याचे सगळ्यात आधी वृत्त दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच शहरामध्ये एलएईडी दिवे बसविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पालिकेने एलएईडी दिव्यांची चाचणी घेतली. त्यानंतर जवळपास संपूर्ण शहरामध्ये एलएईडी दिवे लावण्यास सुरुवात झाली. पोवई नाका ते नगरपालिकेपासून राजवाड्यापर्यंत आणि मोती चौक ते पोलिस मुख्यालयापर्यंत एलएईडी दिवे सध्या लावण्यात आले आहेत. सुमारे दीड हजार एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी दिवे लावण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये बुधवार नाका, करंजे तर्फे ते शाहू स्टेडियमपासून पोवई नाक्यापर्यंत एलएईडी दिवे लावण्यात येणार आहेत.
या एलएईडी दिव्यांमुळे पालिकेची विजेची बचत होणार असून, महिन्याकाठी तब्बल सात लाख रुपये खर्च बचत होणार आहे. या एलईडी दिव्यांमुळे शहर उजळून निघाले असून, रस्त्यावर पडलेली टाचणीही दिसेल, इतका पांढरा शुभ्र प्रकाशझोत एलएईडी दिव्यांचा पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
यवतेश्वर व अजिंक्यताऱ्याहून सातारा शहर एलएईडी दिव्यांमुळे झगमगाट दिसत आहे. पूर्वीचे दिवे पिवसळ होते. त्यामुळे रात्रीचे स्पष्ट दिसत नव्हते. शिवाय वीज बिलही सुमारे १४ लाख रुपये येत होते. परंतु आता एलएईडी दिव्यांमुळे पालिकेचे निम्मे सात लाख रुपये वाचणार आहेत. हे पैसे आता इतर विकास कामांसाठी पालिकेला वापरता येणार आहेत. (प्रतिनिधी)