पूल वाहिला, रस्ता खचला, वीजखांबही पडले

By Admin | Updated: June 7, 2015 00:28 IST2015-06-07T00:27:57+5:302015-06-07T00:28:00+5:30

मान्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात थैमान : फळबागांसह घरांचेही मोठे नुकसान; शेतीला आले तलावांचे स्वरूप

The bridge was blocked, the road went down, electricity was damaged | पूल वाहिला, रस्ता खचला, वीजखांबही पडले

पूल वाहिला, रस्ता खचला, वीजखांबही पडले

सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सहाच्या सुमारास मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला. यामध्ये शेतीच्या नुकसानीसह घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. रस्त्याकडेची झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडल्यामुळे व वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. कऱ्हाड तालुक्यात नांदलापुरात पाणंद रस्ता खचला तर शेतात पाणी साचून अक्षरश: शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीजवितरण कंपनीचे सर्वांत जास्त नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.
ओढे-नाले दुथडी भरून वाहिले
गुरूवारी मध्यरात्रीनंतर व शुक्रवारी सायंकाळी कऱ्हाड, मलकापूर शहरासह दक्षिण भागात पावसाने चांगलेच थैमान घातले. अचानक आलेल्या जोरदार पावसाने ओढे - नाले दुथडी भरून वाहत होते. या मुसळधार पावसामुळे नांदलापूर, कापील, गोळेश्वर, जखिणवाडी परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अतिक्रमणामुळे रस्ता खचला
नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील नांदलापूर-चांदोली रस्ता या पाणंद रस्त्यालगतच्या ओढ्यावर ठिक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे खाणीकडून आलेले पावसाचे पाणी रस्त्यावरून उलटल्याने हा पाणंद रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. रस्ता खचलेला गाळ शेतात शिरल्यामुळे भुईमुगाचे पीक गाळात मुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पालेभाज्या चिखलात
जखिणवाडी, कापील परिसरातील शेतकऱ्यांचा पालेभाज्यांचे पीक घेण्याकडे अधिक कल आहे. त्यानुसार या भागात काकडी, वांगी, टोमॅटो, दोडका, दुधी भोपळा, पालक या भाजीपाल्याचा चांगलाच बहर आहे. दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाट होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: The bridge was blocked, the road went down, electricity was damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.