शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची वीट लवकरच रचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:20+5:302021-08-15T04:40:20+5:30
सातारा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नॅशनल मेडिकल कमिशनकडून नुकतीच पाहणी झाली. महाविद्यालयाच्या एकूणच कामकाजाबाबत समितीने समाधान व्यक्त केले असून ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची वीट लवकरच रचणार
सातारा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नॅशनल मेडिकल कमिशनकडून नुकतीच पाहणी झाली. महाविद्यालयाच्या एकूणच कामकाजाबाबत समितीने समाधान व्यक्त केले असून महाविद्यालयाची वीट लवकरच रचली जाणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चाके अनेक वर्षे रुतलेली होती. २०१२ मध्ये या महाविद्यालयाला राज्य शासनाकडून परवानगी मिळाली होती. त्यानंतर महाविद्यालय प्रत्यक्षात आकार घेण्यासाठी मधली ९ वर्षे निघून गेली. मात्र, जागेचा प्रश्न मिटला असल्याने कृष्णानगरमधील पाटबंधारे विभागाच्या ६२ एकर जागेवर हे महाविद्यालय आता उभे राहणार आहे. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी ४९५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग भरण्यास परवानगी दिली असून महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य देखील खरेदी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्या तरी केंद्राची एक कमिटी अंतिम निर्णय घेणार होती. या समितीकडून ‘लेटर ऑफ परमिशन’ मिळणे बाकी हाेते. गेल्या तीन दिवसांत या समितीने साताऱ्यात येऊन महाविद्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल असल्याने जिल्ह्याला ५०० खाटांचे रुग्णालय तसेच १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी महाविद्यालय उभारणे जरुरीचे असल्याचे या कमिटीला दिसून आले आहे. सध्या भाडेतत्त्वावर इमारती घेऊन त्यात महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे. आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाविद्यालय व वसतिगृहाची इमारत लवकर उभी करण्याचे संकेत या समितीने दिले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा पाठपुरावा यशस्वी होताना दिसतो आहे.
अहवालासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार...
समितीचा अहवाल प्राप्त होण्यासाठी महिन्याचा कालावधी जाणार आहे. समिती महाविद्यालय उभारणीवर सकारात्मक असल्याने त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेचच पुढील कामकाज वेगाने केले जाणार आहे.
कोट..
दिल्लीच्या समितीने महाविद्यालयाच्या एकूणच कामकाजाची पाहणी केली तसेच कामाबाबत समाधानही व्यक्त केले आहे. त्यामुळे महिन्यानंतर या समितीचा अहवाल सकारात्मकच येईल, अशी खात्री आहे. लवकरच इमारतीचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे.
डॉ. संजय गायकवाड,
अधिष्ठाता, सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
फोटो नेम : १४संजय गायकवाड,
१४कॉलेज