हातपंपाचे गढूळ पाणी विद्यार्थ्यांना !
By Admin | Updated: September 17, 2014 22:26 IST2014-09-17T21:07:01+5:302014-09-17T22:26:38+5:30
कुरणेवाडी : जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

हातपंपाचे गढूळ पाणी विद्यार्थ्यांना !
वरकुटे मलवडी : कुरणेवाडी, ता. माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शाळेसमोर असलेल्या हातपंपाचे पाणी गढूळ व गंजयुक्त असे आहे. तरीही अनेकवेळा जेवण केल्यानंतर या मुलांकडून असे पाणी पिले जात आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माण तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे टोक म्हटले की कुरणेवाडीचे नाव समोर येते. कुरणेवाडीपासून दोन किलोमीटरवर एका बाजूला सांगली जिल्ह्याची तर दुसऱ्या बाजूला पाच-सहा किलोमीटरवर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. वरकुटे मलवडीपासून कुरणेवाडी गाव हे सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी वरकुटे मलवडीमधून वेगळे होऊन कुरणेवाडी गावाची निर्मिती झाली आहे.
कुरणेवाडी या गावची लोकसंख्या एक हजाराच्या पुढे आहे. या गावाला आजही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. गावाला नळपाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे मिळेल तेथून पाणी मिळविण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांचा असतो.
कुरणेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पूर्वी येथे फक्त चौथीपर्यंतच वर्ग भरत होते. अलीकडील काही वर्षांत येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच हातपंप आहे. या हातपंपाला सध्या गढूळ व गंजयुक्त पाणी येत आहे. येथील शाळकरी मुले ही जेवण झाल्यानंतर या हातपंपाचेच पाणी पित असतात. या पाण्यापासून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता कुरणेवाडीतील पालकांतून होत आहे. (वार्ताहर)
टाकीतील पाणी ग्रामस्थांसाठी...
शाळेच्या आवारात पाण्याची टाकी आहे. परंतु ती नादुरुस्त आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा होऊ शकत नाही. मागीलवर्षी एका खासगी मालकाच्या विहिरीतून पाणी आणून टाकीत सोडले जात होते. मात्र आजूबाजूला असणारे ग्रामस्थ या टाकीतून पाणी घरगुती वापरासाठी नेत होते. सध्या येथील मुलांना दफ्तरामध्ये वह्या-पुस्तकांबरोबरच पाण्याच्या बाटल्यांचं ओझं घेऊन यावे लागत आहे.