अश्लील बोलणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप
By Admin | Updated: November 30, 2014 00:31 IST2014-11-30T00:30:43+5:302014-11-30T00:31:50+5:30
साताऱ्यातील घटना : विद्यार्थिंनीने दिली तक्रार; विद्यालयात गोंधळाचे वातावरण

अश्लील बोलणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप
सातारा : विद्यार्थिनींशी अश्लील बोलल्यामुळे येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाला पालकांनी व नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे शाळा व परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित विद्यार्थिनीने तक्रार दिल्यानंतर दत्तू लवटे या शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत घटनास्थळ, पोलीस व नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात दत्तू सुखदेव लवटे (रा. तांदळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हा मागील दोन वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. येथील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या वर्गात साताऱ्यातील दोन मुली शिक्षण घेत आहेत. गुरुवारी लवटे या शिक्षकाने एका मुलीला वर्गात बोलवून घेतले होते. त्याचवेळी तेथे दुसरी मुलगीही आली. त्यावेळी लवटे मुलीशी अश्लील शब्दात बोलला.
विद्यालयातून गेल्यानंतर संबंधित मुलींनी घरी घडलेला हा प्रकार सांगितला. त्यातच शुक्रवारी विद्यालयाला सुटी होती. त्यामुळे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारासच माजी नगराध्यक्ष नासीर शेख, नगरसेवक विजय बडेकर, पालक व काही नागरिक विद्यालयात आले. त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकांकडे झाल्याप्रकराबद्दल विचारणा केली. त्यानंतर शिक्षक लवटेकडे मोर्चा वळवला. लवटेला बेदम चोप देण्यात आला. यावेळी महिलांनीही चप्पलने मारहाण केली. यामुळे शाळा व परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तोपर्यंत पोलिसांना कोणीतरी याची माहिती दिली. नागरिक लवटेला रिक्षातून पोलीस ठाण्यात नेत असतानाच पोलीस तेथे आले. त्यांनी लवटेला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले.
संबंधित मुलीने तक्रार दिल्यानंतर शिक्षक दत्तू लवटेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)