‘उत्तरमांड’च्या भिंतीलगत दगडासाठी भगदाड
By Admin | Updated: December 14, 2014 23:53 IST2014-12-14T21:54:57+5:302014-12-14T23:53:36+5:30
ठेकेदाराचा प्रताप : धरणालगतच दगड फोडून दिवसाढवळ्या वाहतूक, अधिकाऱ्यांचे ‘कानावर हात’

‘उत्तरमांड’च्या भिंतीलगत दगडासाठी भगदाड
चाफळ : गमेवाडी-चाफळ, ता. पाटण येथील उत्तरमांड धरणावर मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून चक्क धरणाच्या भिंंतीजवळच उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाच्या भिंंतीला धोका निर्माण होत असून, महसूल विभाग याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
विभागातील शेतीला पाणी मिळावे व नापीक जमीन ओलिताखाली येऊन जमीन सुजलाम्-सुफलाम् व्हावी, यासाठी गमेवाडी येथे उत्तरमांड धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या धरणाची व्यवस्था कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. धरणामध्ये गेली अनेक वर्षांपासून पाण्याचा साठा करण्यात येत आहे. मात्र, आजही धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे. धरणाच्या भिंंतीखाली सध्या एक ठेकेदार गौण खनिजाचे उत्खनन करत आहे. उत्खनन केलेले दगड धरणाजवळील रिकाम्या जागेत फोडून त्याची राजरोसपणे भरदिवसा वाहतूक करत आहे. या उत्खननामुळे धरणाच्या भिंंतीला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत महसूल खात्याच्या मंडल अधिकाऱ्यांशी संर्पक साधला असता, गौण खनिजाचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. मात्र कारवाई काहीच केली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंचनामा होऊनही जर कारवाई झाले नसेल, तर महसूल खात्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. धरण व्यवस्थापन यापासून अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराचे कर्मचारी याबाबत फुशारक्या मारत आहेत. ‘आमच्या साहेबांनी रॉयल्टी भरली आहे,’ असे ते छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र, रॉयल्टी भरली असली तरी ती किती ब्रास गौण खनिजाची भरली आहे, व प्रत्यक्षात किती ब्रासचे उत्खनन केले गेले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. धरणाच्या भिंतीजवळच भगदाड पाडले जात असताना याकडे एकही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी फिरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून दररोज शासनाच्या तिजोरीला हजारो रुपयांचा चुना लावला जात आहे. याबाबत तत्काळ कारवाई करण्यात येऊन उत्तरमांड धरणाच्या भिंतीला निर्माण होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (वर्ताहर)
म्हणे ते महसूल विभागाचे काम
धरण परिसरात धरणाच्या उभारणी काळातील शिल्लक गौण खनिजाची माहिती आम्ही महसूल खात्यास दिली होती. सध्या धरणाच्या भिंंतीजवळ सुरू असलेल्या गौण खनिजाच्या उत्खननाची परवानगी आम्ही दिलेली नाही. ते महसूल विभागाचे काम आहे.
- व्ही. व्ही. मुंजाप्पा, अभियंता, धरण व्यवस्थापन