कऱ्हाड दक्षिणेतील विंगात नारळ फोडण्याची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:04+5:302021-06-05T04:28:04+5:30
माणिक डोंगरे मलकापूर : कऱ्हाड दक्षिणेतील निवडणूक म्हटलं की विंग येथेच नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा ...

कऱ्हाड दक्षिणेतील विंगात नारळ फोडण्याची परंपरा खंडित
माणिक डोंगरे
मलकापूर : कऱ्हाड दक्षिणेतील निवडणूक म्हटलं की विंग येथेच नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. या वेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत लॉकडाऊनमुळे या प्रथेला बगल देत गावोगावी प्रचाराचा प्रारंभ होत आहे. विंगमधून प्रचाराचा प्रारंभ ही अनेक वर्षांची परंपरा सध्या तरी खंडित झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विंगचा मारुती कोणाला पावणार अशी खरमरीत चर्चा सुरू आहे.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कृष्णा कारखान्याची निवडणूक असो विंग येथे नारळ फोडूनच प्रचाराचा प्रारंभ होतो. दिवंगत यशवंतराव मोहिते, दिवंगत आनंदराव चव्हाण, दिवंगत प्रेमलाताई चव्हाण, दिवंगत जयवंतराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर व मदनराव मोहिते यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणेचे राजकीय पटल गाजवले आहे. चव्हाण, मोहिते, भोसले व उंडाळकरांची दुसरी पिढी सध्या कऱ्हाड दक्षिणेच्या राजकारणात सक्रिय आहे. कऱ्हाड दक्षिणेतील कोणतीही निवडणूक असली सर्व राजकीय पक्ष व नेते प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी विंग येथील मारुती मंदिराची निवड करायचे. तर शेकडो वाहनांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमवून शक्तिप्रदर्शन करत भव्य सभेने प्रचाराचा प्रारंभ केला जात होता. अगदी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे डॉ. अतुल भोसले व रयतचे संघटनेचे उदयसिंह पाटील उंडाळकर या तीन प्रमुख उमेदवारांनी विंग येथील मारुतीलाच नारळ फोडून शक्तिप्रदर्शनात प्रचाराचा प्रारंभ केला होता. तसाच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या निवडणुकीपर्यंत विंगमध्ये नारळ फोडण्याची प्रथा कायम राखली होती. मात्र, या निवडणुकीत कोरोना परिस्थिती व लॉकडाऊनचे कडक नियम असल्यामुळे भोसले यांच्या सहकार पॅनेलचा आटके व तांबवे येथे गाव देवाला नारळ फोडून गटवाईज प्रचाराचा प्रारंभ झाला. तर संस्थापक पॅनेलचा काळम्मावाडी येथे प्रचाराचा काळम्मादेवीला प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला. अशा पध्दतीने या वेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत लॉकडाऊनमुळे पूर्वीच्या प्रथेला बगल देत गावोगावी प्रचाराचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे विंगमधून प्रचाराचा शुभारंभ ही कऱ्हाड दक्षिणेतील अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.
चौकट
रयतचा मुहूर्त कोठे व कधी?
या निवडणुकीत भोसल्यांच्या सहकार पॅनेल विरोधात एकच पॅनेल उभे करून दुरंगी लढतीद्वारे तगडा विरोध करायचा, यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते व काँग्रेसच्या नेत्यांनी चंग बांधला आहे. त्यांच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. मनोमिलनानंतरच धडाक्यात प्रचाराचा शुभारंभ करायचा, मात्र त्याचे ठिकाण व वेळ कधी ठरणार, याबाबत सभासदांसह कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.