जखिणवाडीच्या ऐताहासिक रंगोत्सवाची स्वातंत्र्यपूर्वीपासूनची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:20+5:302021-03-28T04:37:20+5:30
मलकापूर : जखिणवाडी येथील श्रीमळाईदेवी-भैरवनाथ यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ...

जखिणवाडीच्या ऐताहासिक रंगोत्सवाची स्वातंत्र्यपूर्वीपासूनची परंपरा खंडित
मलकापूर : जखिणवाडी येथील श्रीमळाईदेवी-भैरवनाथ यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे सालाबादप्रमाणे होणाऱ्या यात्रेतील ऐतिहासिक रंगोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे.
जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील यात्रेला ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. ही यात्रा तिथीनुसार रंगपंचमीच्या अगोदर किंवा नंतर एक दिवस असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी रंगोत्सव आणि दुसऱ्या दिवशी छबिना मिरवणूक व गुलाल-खोबऱ्यांची उधळण तर सायंकाळी जंगी कुस्त्यांचे मैदान अशी दोन दिवस यात्रा साजरी केली जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील मानाच्या नऊ बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात येते. गावातील वाडेकरी चिमाजी पाटील, नारू कोंडी पाटील, नांगरे पाटील, अंदू पाटील, आवजी पाटील, केरू पाटील, कृष्णा पवार यांच्यासह अनुक्रमे पहिल्या आठ बैलगाड्यांत देवीला अभिषेक घालण्यासाठी आंबील ठेवलेली असते.
नवव्या जाधवांच्या बैलगाडीत रंगाचे बॅरेल ठेवलेले असतात. प्रथम या नऊ बैलगाड्यांची गावातून मिरवणूक काढून देवीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर ग्रामस्थ रंगोत्सव व मसाक हा खेळ खेळतात. त्यामध्ये एकमेकांच्या उघड्या पाठीवर पाणी मारण्याची प्रथा पूर्वीपासून प्रचलित आहे. रंगाची उधळण करत मुख्य रस्त्यावरून बैलगाड्या पळविल्या जातात. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो ग्रामस्थांकडून रंगांची उधळण करण्यात येते. ग्रामस्थांसह यात्रेसाठी येणाऱ्यांसाठी करमणूकपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० मार्चपासून १ एप्रिलपर्यंत श्रीमळाईदेवी भैरवनाथ मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कालावधीत पाहुणे, माहेरवासीनींना गावात येण्यास बंदी केली आहे. देवाची पूजा व फक्त मानाच्या गाड्या मंदिरास प्रदक्षिणा करतील. गावाबाहेरील व गावातील बैलगाड्या तसेच कोणत्याही प्रकारची वाहने ट्रॅक्टर, दोन चाकी, चारचाकी यांना पूर्णतः बंदी राहील. छबिण्याच्या गुलाल खोबरे, ओवाळणे, तोरण अर्पण करणे बंद राहणार असून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत छबीना निघणार आहे. यात्रा कालावधीत शुभेच्छांचे फलक लावण्यासही बंदी आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कार्यवाही करून दंड आकारला जाणार आहे. कोरोनाला थांबवण्यासाठी भाविकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा कमिटी व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
२७जखिणवाडी
जखिणवाडीत श्रीमळाईदेवी- भैरवनाथ यात्रेनिमित्ताने दरवर्षी अशाप्रकारे बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते.