‘लोक काय म्हणतील’चा सल्ला धुडकावून मक्तेदारी मोडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:35+5:302021-02-07T04:35:35+5:30

साताऱ्यातील राधिका रस्त्यावर असणाऱ्या कदम पेट्रोलपंपावर मंगल संजय शिर्के या काम करत आहेत. शिर्के या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या ...

Breaking the monopoly by rejecting the advice of 'what will people say'! | ‘लोक काय म्हणतील’चा सल्ला धुडकावून मक्तेदारी मोडली !

‘लोक काय म्हणतील’चा सल्ला धुडकावून मक्तेदारी मोडली !

साताऱ्यातील राधिका रस्त्यावर असणाऱ्या कदम पेट्रोलपंपावर मंगल संजय शिर्के या काम करत आहेत. शिर्के या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या आहेत. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले. लग्नापूर्वी त्यांच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे त्यांनी बाहेर कोठेच काम केले नव्हते. २००३ला त्या पतीसोबत साताऱ्यात आल्या. रोज त्या मुलाला शाळेत सोडायला जायच्या. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी नोकरीचा फलक दिसला. त्यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम मिळालं. काही महिने त्यांनी हे बंधिस्त काम केलं, पण आपण वेगळं काही तरी काम केलं पाहिजे, असं त्यांना वाटू लागलं. जिथं त्या काम करायच्या त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीच्या ओळखीने त्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याची संधी चालून आली. परंतु पेट्रोल पंपावर पंधरा वर्षांपूर्वी एकही महिला काम करत नव्हती. या ठिकाणी केवळ पुरुषच काम करत होते. त्यामुळे सतत पुरुषांच्या क्षेत्रात काम करून नातेवाईक आणि लोक काय म्हणतील, अस त्यांना काहींनी सल्लाही दिला. पण लोकांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून मंगल शिर्के यांनी पेट्रोल पंपावरील नोकरी स्वीकारली. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या महिला कामगार त्या ठरल्या. पेट्रोल पंपावर एक महिला काम करते, हे पाहून येता-जाता वाहनचालक आश्चर्यचकित व्हायचे. तेव्हा त्यांना स्वत:चा अभिमान वाटायचा. काही दिवसांतच त्यांनी पेट्रोल कसे भरायचे, त्याचा हिशोब कसा ठेवायचा, याची इंत्थभूत माहिती घेतली. त्यानंतर या कामात त्या अल्पावधीतच पारंगत झाल्या. त्यांच्याकडे पाहून इतर महिलांनीही पेट्रोल पंपावर काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एका महिलेने काही दिवस काम केलं. त्यानंतर तिनेही हे काम सोडलं. आता त्या एकट्या महिला कर्मचारी आहेत. तब्बल पंधरा वर्षांपासून सलग पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंगल शिर्के यांचा सातारकरांनाही तितकाच अभिमान आहे.

फोटो : ०६ दत्ता यादव

Web Title: Breaking the monopoly by rejecting the advice of 'what will people say'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.