महिला आंदोलकांनी थापल्या रस्त्यावरच भाकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:27+5:302021-02-07T04:36:27+5:30
सातारा : नही चाहिए हमे अच्छे दिन लौटा दो हमे बुरे दिन म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ...

महिला आंदोलकांनी थापल्या रस्त्यावरच भाकऱ्या
सातारा : नही चाहिए हमे अच्छे दिन लौटा दो हमे बुरे दिन म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर चूल पेटवून भाकऱ्या करत केंद्र शासनाच्या महागाईविरोधात निषेध करण्यात आला.
गॅस दरवाढ त्वरित कमी करावी, ग्रामीण भागातील कुटुंबीयातील महिलांना उपजीविकेसाठी इंधन उपलब्ध करून द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी महिलांकडून तीव्र निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर भाकरी थापण्यात आली व नही चाहिए हमे अच्छे दिन लौटा दो हमे बुरे दिन असे म्हणत सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मार्फत आम्ही सर्व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने दिवसेंदिवस गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे. घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या असून हे दर प्रतिसेंटरला पंचवीस रुपयांनी वाढवण्यात आले आहेत तसेच व्यावसायिक सिलिंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार सामान्य जनतेच्या सामान्य अपेक्षाही पूर्ण करू शकत नाही. वारंवार होणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत वाढीवर सरकारचे बिलकुल नियंत्रण नाही. पेट्रोल, डिझेल दर वाढत आहेत असेच इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. केंद्र सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. केंद्र सरकारने ताबडतोब गॅसची दरवाढ मागे घ्यावी व सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कुसुमताई भोसले, सुजाता बावडेकर, स्मिता शिंदे, जयश्री शिंदे, सुनीता शिंदे, आशा कुंभार, उषा जाधव, उषा पाटील, रूपाली भिसे, रशिदा शेख, प्रभावती बेंद्रे, शुभांगी निकम आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर चूल पेटवून भाकरी थापण्याचे आंदोलन केले. (छाया : जावेद खान)