भिवडीत तलवार हल्ला; वृद्ध गंभीररीत्या जखमी
By Admin | Updated: May 1, 2016 00:15 IST2016-05-01T00:10:36+5:302016-05-01T00:15:16+5:30
सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

भिवडीत तलवार हल्ला; वृद्ध गंभीररीत्या जखमी
कोरेगाव : भिवडी (पुनर्वसीत), ता. कोरेगाव येथे जागेच्या वादातून पाच जणांनी उत्तम रामचंद्र शेलार (वय ६३) यांच्यावर तलवार आणि लोखंडी गजाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तम शेलार हे पाहुण्यांची लग्नपत्रिका राजेंद्र आनंदराव शेलार यांच्या घरी देण्यासाठी गेले होते. तेथून घरी परत जाण्यासाठी चालले असताना कारमधून संतोष सहदेव शेलार, गणेश प्रकाश शेलार, विलास पार्टे, गणेश नामदेव सणस व गणेश सहदेव शेलार हे उतरले. त्यांनी हातात तलवार घेऊन ‘तुला आता खल्लास करतो,’ म्हणत उत्तम शेलार यांच्या डोक्यात तलवारीने वार केला.
त्यानंतर ते पळत सुटले, त्याचवेळी पाठीमागून लोखंडी गज फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांची पत्नी यमुना व भावजय शोभा शंकर शेलार या मदतीसाठी आल्या, त्यांना देखील या युवकांनी मारहाण केली.
उत्तम शेलार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारार्थ सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी गणेश प्रकाश शेलार, गणेश नामदेव सणस व गणेश सहदेव शेलार यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दि. ३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हवालदार अनंत गोसावी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)