आईसह मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला
By Admin | Updated: May 22, 2014 00:21 IST2014-05-22T00:04:12+5:302014-05-22T00:21:51+5:30
वाघेरीतील घटना : मुलाचा मृतदेह सापडला; आईचा शोध सुरू

आईसह मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला
कºहाड/शामगाव : कºहाड तालुक्यातील वाघेरी गावाजवळील आरफळ कॅनॉलमध्ये बुधवारी दुपारी आईसह मुलगा बुडाल्याची घटना घडली. पाचवर्षीय बालकाचा मृतदेह सापडला असून, रात्री उशिरापर्यंत महिलेचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा शिवाजी साळुंखे (वय २८) या आपला पाचवर्षीय मुलगा विराज याच्यासह वाघेरीजवळील गानकांड शिवारातील शेतात भांगलणीसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची सासूही शेतात काम करण्यासाठी आली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विराज शौचास गेला. त्यानंतर अनुराधा या विराजचे हातपाय धुण्यासाठी त्याला घेऊन जवळच्या आरफळ कॅनॉलकडे गेल्या. बराच वेळ उलटून गेला, तरी अनुराधा व विराज परत आले नाहीत. त्यामुळे सासूने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या कॅनॉलकडे गेल्या असता कॅनॉलच्या कडेला अनुराधा यांची चप्पल त्यांना दिसली. मात्र, विराज व अनुराधा कोठेही दिसले नाहीत. संशय आल्यामुळे सासूने याबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने कॅनॉलकडे धाव घेऊन परिसरात सर्वत्र शोधाशोध सुरु केली. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर अनुराधा यांची चप्पल जेथे सापडली होती, त्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कॅनॉलच्या पाण्यात विराज आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, विराजचा बुडून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. विराजची आई अनुराधाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. (प्रतिनिधी)